अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

By Admin | Updated: August 4, 2014 02:13 IST2014-08-03T21:10:48+5:302014-08-04T02:13:10+5:30

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

The best way to get to the last trip is also a good road | अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

 

प्रवीण साळुंके

मालेगाव
येथील महापालिका हद्दीतील पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था ही नित्याच्याचीच बाब आहे. जिवंतपणी तर नाहीच पण मृत्यूनंतरच्या अखेरच्या प्रवासासाठीही चांगला रस्ता मिळू नये यासारखे दुर्दैव नाही. येथील मोचीवाडा भागात शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अंतिम संस्काराला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
महानगरपालिका दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवित असताना शहराच्या पूर्व भागात बोटावर मोजण्याइतके रस्ते सोडल्यास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पश्चिम भागात तर विनाखड्ड्याचा रस्ता हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांना चांगल्या रस्त्याची अपेक्षा किंवा सवयच नसल्याने जिवंतपणी त्यांना खड्ड्याच्या रस्त्यावर वावरणे भाग पडते. मात्र अंतिम संस्काराला जाण्याचा रस्ता तरी किमान चांगला असावा अशी कॅम्पवासीयांची अपेक्षा आहे. मात्र संवेदनहीनतेचा कळस गाठलेल्या मनपाकडून ही अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही. कॅम्प भागातून अंतिम संस्कारासाठी शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर उंचवटे, चाऱ्या व खड्डे पडलेले असल्याने अंत्ययात्रा नेताना हाल होतात.
पायी जाणाऱ्यांचे पाय एकमेकांत अडकत असल्याने मृतदेह पडण्याची शक्यता असल्याने जीवमुठीत धरून चालावे लागते. अंतिम संस्कारास वैकुंठरथाचा वापर केल्यास या रस्त्यावरून ही रथयात्रा जात असताना उंचवट्यामुळे रथ खाली-वर होत असून, त्यामुळे मृतदेह खाली पडण्याची शक्यता असते. रस्त्यावरील खड्डे व चाऱ्यांमध्ये धक्के बसल्याने काहीवेळा अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारे मडके फुटते तसेच मृतदेहाशेजारी बसलेले नातेवाईक एकमेकांवर आदळतात, तर काहींच्या डोक्याला वाहनाचे टप लागते. त्यामुळे हा रस्ता कधी संपतो? असा प्रश्न पडतो. त्यातच रस्ता कमी रुंदीचा असून, त्यावर अतिक्रमण आहे. रस्त्यावर नेहमीच मोठ-मोठे दगड पडलेले असतात. अनेक रस्ते महिनाभरात, तर बुजविलेले खड्डे काही तासातच पूर्ववत होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नव्वद लाख रुपये खर्चाचा सटाणा रस्ता तसेच कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या पाच वर्षांत पूर्ण न झालेला कॅम्प रस्ता होय. जिवंतपणी मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने किमान स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी अपेक्षा कॅम्पवासीयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The best way to get to the last trip is also a good road