ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:05 IST2025-11-27T17:02:00+5:302025-11-27T17:05:24+5:30
ठाण्यातील तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मला दोघांनी रस्त्यात अडवले आणि पैसे लुटले. पण, दुसऱ्या दिवशी येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या सगळ्या प्रकारात तरुणच आता कायद्याच्या कचाट्यात अडकला.

ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
Nashik Crime: सिन्नर-शिर्डी मार्गाने जाताना पांगरी शिवारात दोघा अज्ञात युवकांनी दुचाकीवर येत आपल्या पाठीमागून वार करत खिशातून बळजबरीने १२ हजार ७०० रुपये काढून घेत रस्ता लूट केल्याची तक्रार कल्याणच्या एका युवकाने वावी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी रस्ता लुटीच्या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली. तथापि, दुसऱ्या दिवशी या युवकाने पुन्हा पोलिसांत येऊन आपल्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने पोलिसांना धक्का बसला. त्यामुळे सदर युवकावर लोकसेवकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात दोघा युवकांनी मंगळवारी (दि.२५) रात्री एक ते दीड वाजता पाठीमागून येत आपल्या डोक्यात प्रहार करत बळजबरीने खिशातील १२ हजार ७०० रुपये काढून घेतल्याची फिर्याद प्रणेश चंद्रभान गिते (३०, रा. शिवाजीनगर, भालेराव चाळ, कल्याण, जि. ठाणे) यांनी वावी पोलिसांत दिली होती.
चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने वावीचे पोलिसही तपासाला लागले होते. हल्ला करणाऱ्या दोन तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच तरुण पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर त्याने जे सांगितले ते धक्कादायक होते.
आपल्या कुटुंबीयांशी भांडण झाल्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याचे प्रतिज्ञापत्र त्याने सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या युवकाने पुन्हा आपला जबाब बदलू नये म्हणून त्यास बुधवारी (२६ नोव्हेंबर) सिन्नर न्यायालयात हजर केले. तेथे त्याचा खोटी फिर्याद दिल्याचा जबाबही नोंदवून घेतला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोठावळे अधिक तपास करत आहेत.