मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:43+5:302021-03-26T04:29:43+5:30

कोरोनामुळे यावर्षी सगळीकडे घरगुती व साध्या पद्धतीने विवाह साेहळे पार पडत आहेत. त्यामुळे लग्नातील लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च ...

Wedding function in the presence of very few people | मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य

कोरोनामुळे यावर्षी सगळीकडे घरगुती व साध्या पद्धतीने विवाह साेहळे पार पडत आहेत. त्यामुळे लग्नातील लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळला जात आहे. बॅण्डपासून ते मंडप, स्वयंपाक, घोडा, वाहनाचा खर्च यामुळे लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. लग्न एकदाच होते. म्हणून गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत लग्नकार्यात लाखो रुपयांचा खर्च करत असतात. या लाखो रुपयांच्या खर्चाला आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे सुरू झाले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले, तसेच अनेक समाज प्रबोधनकारांनीही लग्नातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रबोधन केले; मात्र त्यांनाही अद्याप फारसे यश लाभले नाही.

जिल्ह्यात दरवर्षी शेकडो लग्नकार्य होत असतात. लग्नकार्यात दोन लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंतचा खर्च होत असतो. श्रीमंत तर लग्न सोहळ्यामध्ये श्रीमंतीचे दर्शनही घडवीत असतात. या श्रीमंत लोकांचे हेवेदावे करून गोरगरीब कुटुंबही डोक्यावर कर्जाचा बोजा असताना उधार उसनवारीने पैसे गोळा करून लग्नकार्यात लाखोंचा खर्च करीत होते. या लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अनेक समाज प्रबोधनकार व कीर्तनकारांनी प्रयत्न केले होते; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही; पण मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सामूहिक लग्न सोहळे बंद झाले आहेत, तसेच घरगुती लग्न सोहळ्यावरही गर्दीचे निर्बंध आल्यामुळे आपोआपच लग्नातील अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत, मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा होत असून, लाखोंचा खर्च काही हजारांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे कोरोनाचा कहर लोकांच्या जीवासाठी धोका असून, दुसरीकडे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जणू वरदानच ठरत आहे.

Web Title: Wedding function in the presence of very few people