देवबारा येथे हजारो भाविकांच्या साक्षीने वाग्देव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:55 AM2020-02-17T11:55:26+5:302020-02-17T11:55:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सापुड्यात सणोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या भावभक्तीतच देवबारा ...

Wagadeva Yatra, witnessed by thousands of devotees at Deobara | देवबारा येथे हजारो भाविकांच्या साक्षीने वाग्देव यात्रा

देवबारा येथे हजारो भाविकांच्या साक्षीने वाग्देव यात्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : सापुड्यात सणोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या भावभक्तीतच देवबारा ता. धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव पार पडला. या यात्रेत मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला.
निसगार्चा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु-पक्षी, मानवांवर हल्ला करू नये, गावपाड्यात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवारात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जाते. येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा (गुजरात) येथे रवाना होतात. वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या नव्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू फुलांची दारु यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून ही आजही कायम ठेवली आहे.
या यात्रेसाठी धडगाव तालुक्यातील मांडवी, खामला, काकरदा, घाटली, निगदी, वलवाल, गोरांबा यासह अन्य गावातील पंचमंडळी देखील सहभागी झाले असून यात्रेसाठी त्यांनीही योगदान दिले आहे.


धडगाव-शहादा रस्त्यावर देवबारा हे गाव असून त्याची वाग्देवाचे स्थान म्हणून आदिवासींमध्ये ओळख आहे. तेथे महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आहे. सोमवारी सुरु झालेल्या या यात्रोत्सवात पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुषांनी लक्ष वेधून घेतले. डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाग्देवाची स्तुतीगीते सादर करण्यात आली. या ठिकाणी रात्री सोंगाड्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यात कलावंतांनी गीत व नाटकातून वाघाचे महत्त्व व त्यांचे संवर्धन कसे झाले पाहिजे याबाबत प्रबोधन केले. आदिवासी समुदायात देवरुप मानल्या गेलेल्या वाघाची दिनचयार्ही त्यांनी सोंगाड्या पार्टीद्वारे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. देवबारा येथील यात्रेनंतर सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातील यात्रोत्सवांना सरुवात होते. महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे यात्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या दिसून येत आहे.

Web Title: Wagadeva Yatra, witnessed by thousands of devotees at Deobara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.