रस्ता सुरक्षा अभियान काळातच वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:40 PM2020-01-22T12:40:55+5:302020-01-22T12:41:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ...

Transport traffic during the road safety campaign | रस्ता सुरक्षा अभियान काळातच वाहतुकीचा बोजवारा

रस्ता सुरक्षा अभियान काळातच वाहतुकीचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हे कार्यक्रम फक्त फोटो सेशनसाठी होत असून रस्ता सुरक्षेसंदर्भात मात्र प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवताना दिसत आहेत. तसेच शहरातील बसस्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेक जण वाहतुकीचे नियम मोडताना दिसून येत आहेत.
आरटीओ विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहावर ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात केलेल्या सर्वेक्षणात सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटनासाठी मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसून येतात. बसस्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता भर रस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे बसस्थानकातून बसेस बाहेर निघत असताना अनेकदा याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होतात. या परिसरात वाहतूक शाखेचे कर्मचारी असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील गांधी पुतळा परिसरात एकेरी वाहतूक मार्ग असूनदेखील वाहनधारक नियम मोडताना दिसून येतात. डायमंड बेकरीजवळ तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने याठिकाणी दिवसभर मोठ्या वाहनांची वर्दळ होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असूनही दिवसभर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने याकडे संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते.
आरटीओ विभागाने एक दिवस शहरातील नवीन पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर काही नागरिकांना रस्ता सुरक्षासंदर्भात कार्यक्रम घेत कार्यक्रमाचे फोटोसेशन झाले. मात्र संबंधित विभाग येथूनच पुन्हा माघारी फिरले. तसेच रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे याविषयी जनजागृती होताना दिसत नाही. शासकीय कार्यक्रम म्हणून कार्यक्रम न करता या सप्ताहाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल अशाप्रकारे उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात याव्यात.
रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वत:सह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊन लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल आणि यातून रस्ता सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.

शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान राबविण्यात येते. मात्र वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. तसेच खाजगी वाहतूक करणारे वाहनधारकही बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Transport traffic during the road safety campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.