स्थानिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:48 PM2020-07-09T12:48:09+5:302020-07-09T12:48:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मागील १५ दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. ...

Tourist attraction towards local tourist destinations | स्थानिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची ओढ

स्थानिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची ओढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : मागील १५ दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून घरातच असणाऱ्या लोकांची पावले स्थानिक पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत.
दरवर्षी पहिला पाऊस झाला की सातपुड्याच्या पर्वतरांगांवर मोठ्या प्रमाणात गवत व नवीन झाडेझुडपे उगवतात. यामुळे सातपुडा पर्वतरांगांवर हिरवी चादर आच्छादली गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर सातपुड्यातील चांदसैली, देवगोई, दहेल या घाटात दाट धुके पसरते. या सर्व बाबी सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाºया तरूणाईला मोठ्या प्रमाणात खुणावतात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत कोणालाही पर्यटनासाठी बाहेरील पर्यटनस्थळांवर जाता आले नाही. अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून पुढील नजीकच्या काळात पर्यटनाचा आनंद कधी घेता येईल याबाबत निश्चित सांगता येणे शक्य नाही. शासनाने जरी पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुली केली तरी लोक कोरोनाच्या भीतीमुळे बाहेरील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवतील, असा अंदाज आहे. अशातच सातपुडा हिरवळीने बहरल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांची पावले सातपुड्याच्या दिशेने वळू लागली आहेत. मागील शनिवारी व रविवारी सुटीचे दिवस असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भ्रमंती करताना दिसून आले.
मागील आठवड्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेत पावसाची दररोज हजेरी सुरू होती. यामुळे कोठार, माकडटेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पाहायला मिळत आहे. अद्याप दमदार पाऊस झाला नसून सातपुड्यातील नद्या-नाले व धबधबे सुरू झालेले नाहीत. दमदार पाऊस झाला की सातपुड्यातील नदी-नाले व धबधबे खळाळून वाहायला सुरुवात होते. असे असले तरी घरातच बंद असलेल्या नागरिकांना सुरुवातीत सातपुड्यात पसरलेली हिरवळ व त्यासह अनेक नयनरम्या दृष्य भुरळ घालीत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातच राहून कंटाळलेले लोक निसर्गचा आनंद घेण्यासाठी सातपुड्याच्या कुशीत गर्दी करताना दिसून येत आहेत. तरुण मुले तर आपल्या मित्रांच्या ग्रुपसह दोन-तीन कापड्यांचे ड्रेस व स्वतंत्र कॅमरा घेऊन फोटोग्राफीसाठी दररोज चांदसैली घाटात दिसून येत आहेत. तर काही आपल्या परिवारासह सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

सातपुडा पर्वतरांगात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी यादरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. ‘व्ह्यू पार्इंट’ म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेशी जागा, छत यासारख्या अनेक बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीदेखील होऊ शकते. सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Tourist attraction towards local tourist destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.