तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी केली रस्त्यांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:27+5:302021-02-05T08:07:27+5:30

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहामधील डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेधार्थ नवापूर भाजप व संतप्त नागरिकांनी नवापूर ...

Tehsildar Mandar Kulkarni inspected the roads | तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी केली रस्त्यांची पाहणी

तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी केली रस्त्यांची पाहणी

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहामधील डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेधार्थ नवापूर भाजप व संतप्त नागरिकांनी नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार व बांधकाम विभागाचे अभियंते संदानशिव यांना निवेदनासोबत बांगड्यांचा आहेर दिला.

पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी जोरदार घोषणीबाजी करत मुख्याधिकारी यांच्या दालनात विरोधक व नागरिकांनी गदारोळ केला. पालिकेचे अधिकरी व बांधकाम विभागाचे अधिकारी विकास कामांवर लक्ष देत नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले धारेवर धरले व अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला.

नवापूर शहरातील गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा येथील डांबरीकरणाचे काम तत्काळ थांबविण्याबाबतचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना प्रभाग सहा कुंभारवाडा येथील नागरिकांनी दिले. या वेळी भारतीय जनता पाटीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी उपाध्यक्ष अनिल वसावे, जयंती अग्रवाल, हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाने, नीलेश प्रजापत, जितू अहिरे, स्वप्नील मिस्त्री, घनश्याम परमार, कमलेश छत्रीवाला, कुणाल दुसाने, अनिल सोनारसह नागरिक उपस्थित होते. या वेळी तीन वेगवेगळे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कुंभारवाडा ते नवनीत लोहार यांच्या घरापर्यंत डांबरीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे करावे, २० वर्षांपूर्वीची असलेली गटार लाईन नवीन करून देणे, रस्त्याची उंची वाढल्याने नागरिकांच्या घराच्या पायऱ्या रस्त्यात दाबल्या गेलेल्या आहेत, पावसाळ्यात घरात पाणी शिरते, डांबरीकरणाचे काम रस्त्यावर न करता रस्त्याचे अर्धा फूट खोदकाम करून करावे, यावर योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपसह नागरिकांनी दिला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची राहील, असे निवेदन देण्यात आले.

यानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा रस्त्यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित प्रशासनाला यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सूचना केल्या. नवापूर शहरातील डांबरीकरण कामामुळे नवापूर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. पालिकेतील विरोधकांचे मौनदेखील शहरात चर्चेचा विषय बनला आहे. नागरिकांच्या आग्रहाखातील दर्जेदार रस्ता तयार करून पालिकेने चांगल्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

Web Title: Tehsildar Mandar Kulkarni inspected the roads