सातपुड्याच्या पायथ्याशी दरवळतो ‘केसर’चा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:13 IST2020-05-26T12:13:30+5:302020-05-26T12:13:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या आंबा बागांमधील केसरचा गोडवा यंदा लांबला असला तरी गेल्या ...

The sweetness of ‘saffron’ flows at the foot of Satpuda | सातपुड्याच्या पायथ्याशी दरवळतो ‘केसर’चा गोडवा

सातपुड्याच्या पायथ्याशी दरवळतो ‘केसर’चा गोडवा

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या आंबा बागांमधील केसरचा गोडवा यंदा लांबला असला तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबा बागांमध्ये केसर आंबा विक्रीस सुरूवात झाली आहे. तालुक्यासह जिल्ह्यातून तसेच गुजरात राज्यातील काही परिसरातून खवैय्ये खरेदीसाठी दाखल होत असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत केसर आंबा खरेदी करण्यात येत आहे.
तालुक्यातील गोपाळपूर, रांझणी, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरात १०० हेक्टरवर आंबा बागा असून, यात मुख्यत्वे गोपाळपूर येथील केसर आंबा प्रसिद्ध आहे. या बागांमधील केसर आंबा सेंद्रीय खत, जैविक खते, झाडांची वेळोवेळी राखण्यात येणारी निगा यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असून, निव्वळ सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत करण्यात येत असल्याने प्रसिद्ध आहे. या केसर आंब्याचे ब्रॅण्डींग झाल्यास कोकणातील आंब्यासोबत स्पर्धा होऊ शकते, असेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, तालुक्यात १०० हेक्टरवर आंबा बागा असल्या तरी यात घराच्या परसबागेतील तसेच शेत बांधावरील आंबा झाडांची मोजदाद नाही. तालुक्यात घेण्यात येणाऱ्या आंबा उत्पादनापैकी ४० टक्के आंबा उत्पादन गोपाळपूर, प्रतापपूर, रांझणी शिवारातून होत असते. या परिसरातील केसर आंबा आपल्या वेगळ्या चवीने प्रसिद्ध आहे.

गोपाळपूर येथील केसर प्रजात सातपुड्यातील अनमोल ठेवा असून, यात कोणत्याही प्रकारचे कलम किंवा सरमिसळ नसून, त्याची चव वेगळी आणि गोड आहे.
- किर्तीकुमार राणा, आंबा उत्पादक, शेतकरी

Web Title: The sweetness of ‘saffron’ flows at the foot of Satpuda