जिल्ह्यातील सवालाख जनावरांना मिळणार पाच लाख लसींचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:36+5:302021-05-17T04:29:36+5:30

नंदुरबार : पावसाळ्यात गुरांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर गुरांचे मान्सूनपूर्व लसीकरण शिबिर दरवर्षी घेण्यात येते. ...

Swalakh animals in the district will get a dose of five lakh vaccines | जिल्ह्यातील सवालाख जनावरांना मिळणार पाच लाख लसींचा डोस

जिल्ह्यातील सवालाख जनावरांना मिळणार पाच लाख लसींचा डोस

नंदुरबार : पावसाळ्यात गुरांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर गुरांचे मान्सूनपूर्व लसीकरण शिबिर दरवर्षी घेण्यात येते. यंदा कोरोनामुळे राज्यात गुरांचे लसीकरण लांबण्याची शक्यता असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. यातून सुमारे १ लाख २१ हजार पाळीव गुरे, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या यांना लस दिली जाणार आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश आदिवासी शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. बिगर आदिवासी शेतकरीही शेतीसोबत पशुपालनाचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय करतात. यातून आर्थिक लाभ होत असल्याने, ते याकडे लक्षही देतात. दरम्यान, पावसाळ्यात उगवणारा हिरवा चारा पाळीव गुरांच्या आजारपणाचेही कारण ठरतो. सोबत कीटकजन्य आजारही शक्य असल्याने, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी मे व जून महिन्यात मान्सूनपूर्वी लसीकरण करण्यात येते. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

कोणकोणत्या दिल्या जातात लसी?

जिल्ह्यातील पाळीव गुरांना घटसर्प, फऱ्या या लसी दिल्या जातात. यंदा चार लाख गायी, म्हशी, बैल यांना या लसी देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील पाळीव शेळ्या व मेंढ्यांना ३ लाख १५ हजार आंत्रविशार आजारावर लसी देण्यात येणार आहेत. बुधवारपासून हे लसीकरण सुरू होणार आहे.

कोंबड्यासाठी सात लाख लसी

जिल्ह्यातील नवापूर येथे नुकतेच बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावल्या होत्या. यामुळे जिल्ह्यात कोंबड्यांना विविध आजारांपासून वाचविण्यासाठी सात लाख लसींचा पुरवठा केला जाणार आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने १७ पथकांची नियुक्ती केेली असून, कारवाई होणार आहे.

गायी व म्हशींच्या लसीकरणासाठी पाठपुरावा केला होता. गुरे सुरक्षित आहेत. पावसाळ्यापूर्वी लसीकरण शिबिरे घेण्याची गरज आहे.

- देविदास माळी, पशुपालक, काकर्दे ता.नंदुरबार.

सातपुड्यात पावसाळ्याच्या मध्यात रोगांमुळे गुरे दगावू शकतात. यातून मेपासून लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा असते, परंतु ती अद्याप सुरू झालेली नाही.

- राकेश महाजन, पशुपालक, काकर्दे ता.नंदुरबार

Web Title: Swalakh animals in the district will get a dose of five lakh vaccines