नेत्यांनी पायपीट केलेला रस्ता २५ वर्षानंतरही अपूर्णच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:57 PM2021-01-24T12:57:39+5:302021-01-24T12:57:49+5:30

राजरंग रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सातपुड्यातील बहुचर्चित रस्ता म्हणजे तोरणमाळ-खडकी-कुंड्या- झापी- भादल-सावऱ्या. तब्बल २५ वर्षापूर्वी तत्कालिन ...

The road paved by the leaders is still incomplete after 25 years! | नेत्यांनी पायपीट केलेला रस्ता २५ वर्षानंतरही अपूर्णच !

नेत्यांनी पायपीट केलेला रस्ता २५ वर्षानंतरही अपूर्णच !

Next

राजरंग

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार :  सातपुड्यातील बहुचर्चित रस्ता म्हणजे तोरणमाळ-खडकी-कुंड्या- झापी- भादल-सावऱ्या. तब्बल २५ वर्षापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या रस्त्याची घोषणा केली होती. ही घोषणा करताना त्यांचे डोळे अक्षरश: पाणावले होते. ही आठवण यासाठी की २५ वर्षानंतरही जेमतेम होणाऱ्या या रस्त्यावर शनिवारी एक दुर्दैवी अपघाताची घटना घडली. त्यात सहा जण जागीच दगावले. या घटनेने संपूर्ण सातपुड्यात शोककळा पसरली आहे. घटनेचे दोषी कोण? याबाबतचा खल सुरू राहील पण २५ वर्षानंतरही एखाद्या मुख्यमंत्र्याने त्या भागात स्वत: भेट देऊन केलेल्या घोषणेची अंमलबजावणी होऊ नये हीदेखील एक वेदनादायी बाब आहे.
सातपुड्यातील खडकी, ता.धडगाव येथे कुपोषणाने मोठ्या प्रमाणावर बालकांचा बळी गेला होता. ही घटना सामाजिक कार्यकर्ते आणि वृत्तपत्रातून बाहेर आल्यानंतर त्यावेळी संपूर्ण राज्य शासन हादरले होते. तत्कालिन आदिवासी विकासमंत्री स्व.गो.शि. चौधरी, आरोग्यमंत्री स्व.डॉ.दौलतराव आहेर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्या भागात दौरा केला. त्यानंतर स्वत: तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यावेळची अवस्था अशी होती की, तोरणमाळपासून पुढे सातपुड्यातील गावांमध्ये थेट नर्मदा नदीपर्यंत रस्तेच नव्हते. त्यामुळे डोंगरदऱ्यातील रस्त्यावर पायपीट करीत गावांना पोहोचणे हा एकमेव मार्ग होता. मंत्र्यांनी तोरणमाळ ते खडकी हे सात किलोमीटरचे अंतर पायी जाऊन भेट दिली. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांची वेळ आली त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर कुठे उतरवावे यासाठी अधिकाऱ्यांची धांदल उडाली. खडकी या गावाला हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तांत्रिक अडचण असल्याने सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसाठी खडकी पॉईंटवर हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून सात किलोमीटर पायी मुख्यमंत्र्यांना जावे लागणार होते. अधिकाऱ्यांना ती बाब सहन झाली नाही. त्यामुळे सर्व तांत्रिक अडथळे पार करीत रात्रीतून खडकी गावात हेलिपॅड तयार करण्यात आले व मुख्यमंत्र्यांना थेट तेथे उतरवण्यात आले. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तेव्हा तेथे रस्तेच नसल्याची बाब समोर आली. त्यांचे दु:ख पाहून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचेही डोळे पाणावले आणि भरलेल्या हृदयाने त्यांनी ‘आजपासूनच रस्त्याचे काम सुरू करा...’ असे अधिकाऱ्यांना आदेश दिले. मुळातच हा रस्ता इतका घाटाचा की त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. पुढे १० वर्षांनी तत्कालिन खासदार माणिकराव गावीत यांनी खासदार निधीतून काही निधी दिला. पण त्यातूनही काम झाले नाही. अखेर पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत २०१३ मध्ये रस्त्याला मंजुरी मिळाली आणि ४८ कोटींच्या रस्त्याचे काम तेव्हापासून सुरू आहे. अजूनही ते पूर्ण झालेले नाही. हा रस्ता आता शनिवारी झालेल्या अपघाताने चर्चेत आला आहे. 
एकूणच या रस्त्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. कुपोषणाच्या घटनेच्या पाहणीसाठी तेव्हाचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड हे गावापर्यंत गेले. पण परत येताना त्यांना याच रस्त्यावरुन झोळी करुन आणावे लागले होते. त्यांच्यासोबतचे आमदारांनी रस्त्यावरची कसरत पाहून आधीच माघार घेतली होती. नेत्यांनी इतकी कसरत केलेल्या रस्त्याचे काम २५ वर्षातही पूर्ण होऊ नये ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. कुपोषणाने अनेक बालकांच्या मृत्यूनंतर तेव्हाच्या सरकारला रस्ता करण्याची कल्पना सुचली. आता या अपघाताच्या घटनेनंतर तरी रस्ता तात्काळ पूर्ण करण्याची सुबुद्धी सरकारला येवो हीच अपेक्षा.

Web Title: The road paved by the leaders is still incomplete after 25 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.