जिल्ह्यातील चार वाईन शॉपवर दारूबंदी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:07 IST2020-05-03T13:06:41+5:302020-05-03T13:07:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुरातील दोन आणि नंदुरबार व शहाद्यातील प्रत्येकी एका वाईन शॉपची दारूबंदी विभागाच्या पथकांनी तपासणी ...

Prohibition department action on four wine shops in the district | जिल्ह्यातील चार वाईन शॉपवर दारूबंदी विभागाची कारवाई

जिल्ह्यातील चार वाईन शॉपवर दारूबंदी विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुरातील दोन आणि नंदुरबार व शहाद्यातील प्रत्येकी एका वाईन शॉपची दारूबंदी विभागाच्या पथकांनी तपासणी केली असता त्यातील साठ्यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याने या चारही शॉप चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात इतरही वॉईन शॉपची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेली अवैध दारू विक्रीमुळे दारू बंदी विभाग देखील चक्रावला आहे. ही दारू येते कुठून म्हणून तपासणी करण्याचे आदेश राज्यस्तरावरून देण्यात आले. त्यानुसार नाशिक व धुळे येथील पथक नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाने ठिकठिकाणच्या वाईन शॉपची तपासणी केली.
नाशिक येथील पथक नंदुरबारात आले असता सोनी वाईन शॉप उघडण्यासाठी चालकाला बोलविण्यात आले. परंतु ते आलेच नाहीत. त्यामुळे पथक पुढील तपासणीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अर्थात १ मे रोजी स्थानिक पथकाने अर्थात जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या पथकाने या शॉपची तपासणी केली. तपासणी दरम्यान दारू साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोनी वाईन शॉपच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय नाशिक येथील पथकाने नवापूर येथील दोन वाईन शॉपची देखील तपासणी केली. त्यात एस.एम.वाईन शॉप व एम.डी.वाईन शॉप यांचा देखील समावेश आहे. तेथेही मोठ्या प्रमाणावर दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्या दोन्ही वाईन शॉप चालकांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
शहादा येथील आर.के.वाईन शॉपची देखील तपासणी करण्यात आली. तेथेही साठ्यात तफावत आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दारू बंदी विभागासह स्थानिक पोलिसांनी देखील यापूर्वी शहरातील काही बारवर छापा टाकला असता तेथे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध देखील स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करून दारूबंदी विभागाने संबधीतांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

Web Title: Prohibition department action on four wine shops in the district