दरा फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:10+5:302021-03-26T04:30:10+5:30

कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या. पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांसह वाढती ...

Passengers' condition due to lack of shelter at Dara Phata | दरा फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल

दरा फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल

कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या. पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांसह वाढती प्रवासी संख्या आणि उन्हाचे वाढते तापमान याबाबत आता विचार होणे गरजेचे झाले आहे. दरा फाट्यावरून खेतियाकडून धडगावकडे जाणारे तसेच म्हसावद, रामपूर, कन्साई, नवलपूर, आवगे, दरा, फत्तेपूर जाण्यासाठी जवळील प्रवाशांना दराफाटा येेथे यावे लागते. परंतु या ठिकाणी प्रवासी निवाराच नसल्याने प्रवशांना भर उन्हात ताटकळत बस किंवा इतर वाहनांची उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणासाठी जी झाडे होती तेदेखील तोडण्यात आले असून नव्याने लावण्यात आलेली झाडे दिसेनाशी झाली असून तो संशोधनाचा विषय ठरत आहे. कारण त्या नव्याने लावण्यात आलेल्या झाडांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाण्याअभावी झाडे सुकून गायब झाली आहेत.

वाढत्या उन्हात या ठिकाणी एकही छत नसल्याने एखाद्या वयोवृद्ध इसमाचा किंवा बालकाचा जीव धोक्यात येऊ शकतो ही शक्यताही नाकारता येत नाही. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच परिसरातील गावे चर्चेत राहत असतानासुद्धा या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधी व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

धुळीने प्रवासी हैराण

कोळदा-खेतिया आंतरराज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण ज्या-ज्या ठिकाणी कामे झालीत ते सोडून जे काम अपूर्ण आहे त्या-त्या ठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकावा होतो. प्रवाशांना धुळीमुळे रोजचा किती त्रास होतो याची थोडी तरी जाणीव आहे का कुणाला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Passengers' condition due to lack of shelter at Dara Phata