परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:07+5:302021-04-06T04:29:07+5:30

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन ...

Mixed reaction among parents regarding exam cancellation | परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागले होते. सुदैवाने तोपर्यंत दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आटोपल्या होत्या. फक्त दहावीचा एक पेपर रद्द झाला होता. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले होते. यंदादेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शालेय शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा होणार नसल्याचे तर नववी व अकरावीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने पालक व शैक्षणिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेली वर्षभर पहिली ते आठवीच्या शाळाच सुरू झाल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी १०० टक्के विद्यार्थी उपस्थित नसल्याने अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिले ऑनलाईन शिक्षणही १०० टक्के यशस्वी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशात परीक्षा झाल्या तरी विद्यार्थी परीक्षेला सामोरे कसे जाणार हा प्रश्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदादेखील नववी आणि अकरावीच्या परीक्षा होण्याची शक्यता कमीच आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन झाल्यास तीदेखील मोठी रिस्क ठरू शकते. एकंदरीतच यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्षदेखील ढकलपासच होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबतही पालकांना चिंता आहे. शाळा सुरू झाल्या तर आरोग्याचा प्रश्न आणि शाळा बंद राहिल्या तर शिक्षणाचा प्रश्न अशा कात्रीत पालक सापडले आहेत.

Web Title: Mixed reaction among parents regarding exam cancellation