बहुप्रतीक्षित खावटी योजनेची आजपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST2021-05-01T04:29:16+5:302021-05-01T04:29:16+5:30

नंदुरबार : बहुप्रतीक्षित खावटी अनुदान योजनेला अखेर १ मे चा मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या योजनेचा शुभारंभ ...

Implementation of much awaited Khawati scheme from today | बहुप्रतीक्षित खावटी योजनेची आजपासून अंमलबजावणी

बहुप्रतीक्षित खावटी योजनेची आजपासून अंमलबजावणी

नंदुरबार : बहुप्रतीक्षित खावटी अनुदान योजनेला अखेर १ मे चा मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमात सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. आदिवासी जमातीत मजुरांची संख्या जास्त असल्याने अशा परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार आहे.

पाडवी म्हणाले की, कोविड-१९ च्या साथरोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसलेल्या राज्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत पुरवण्याची खावटी योजना पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि किराणा वस्तूंचे वितरण असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब एकूण ४ हजार रुपये देण्यात येणार असून त्यापैकी दोन हजार रुपये पात्र लाभार्थी कुटुंबांना बँक खात्यात देण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार किमतीच्या किराणा वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती या वस्तूंचा समावेश आहे.

Web Title: Implementation of much awaited Khawati scheme from today