कोविड नियमांचे पालन करीत यंदा होलिकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:37+5:302021-03-27T04:31:37+5:30

काेरोना संसर्ग बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून संसर्गाची भीती आहे. यंदा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन ...

Holi festival this year following the rules of Kovid | कोविड नियमांचे पालन करीत यंदा होलिकोत्सव

कोविड नियमांचे पालन करीत यंदा होलिकोत्सव

काेरोना संसर्ग बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून संसर्गाची भीती आहे. यंदा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत काठी येथील मानाची राजवाडी होळी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी काठी येथे तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. प्रसंगी मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, फौजदार महेश क्षीरसागर, पोलीस पाटील रणजित पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, सरपंच स्नेहा पाडवी, सागर पाडवी, राजेंद्र पाडवी, शेरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत पाडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी होलिकोत्सवाच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या काठीची मानाची राजवाडी होळी दरवर्षी माेठ्या उत्साहात साजरी केली जाते. पाळणी केलेले बांधव मोठ्या मनोभावे आपली पाळणीची सांगता याच होळीत करतात. स्वतःचे आरोग्य, इतरांचे आरोग्य चांगले राहो, पाणी पाऊस चांगला होवो, धनधान्य चांगले पिको, सर्वत्र शांतता नांदो, भुकबळी, महामारी, महापूर, भूकंप यासारखे अस्मानी संकटे भूमीवर नको येवोत, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी होळीला केली जाते.

यंदा कोरोनामुळे होलिकोत्सव हा शासनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आढावा बैठकीत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावर चर्चा झाली. यावेळी बाहेरून कोणत्याही व्यापाऱ्यांनी होळीच्या वेळी गावात दुकाने थाटण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बाहेरगावाहून कोणीही व्यावसायिक मंडळींनी दुकाने आणू नये यासाठी सूचना करण्यात आल्या. काठीच्या होलिकोत्सवाला सुमारे ९०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे. या होळीला सातपुड्यात मोठे महत्त्व आहे. यातून याठिकाणी आदिवासीबांधव मोठ्या संख्येने येतात. यंदा मात्र होळी साधेपणाने होणार असल्याने साध्या पद्धतीने विधीवत पूजन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पाळणीधारक यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात येवून होलिकोत्सव होणार असल्याने बाहेरगावाहून इतरांनी येण्याचे टाळावे, अशी विनंती करण्यात येत आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींच्या मार्गदर्शनात युवक होळीसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Holi festival this year following the rules of Kovid