सातपुड्यातील युवकाने सर केेले युरोपातील सर्वोच्च शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:34+5:302021-07-09T04:20:34+5:30

नंदुरबार : युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूस चार भारतीयांनी सर करीत इतिहास घडवला आहे. ३६० एक्सप्लोरर टीममार्फत ही ...

The highest peak in Europe was climbed by a young man from Satpuda | सातपुड्यातील युवकाने सर केेले युरोपातील सर्वोच्च शिखर

सातपुड्यातील युवकाने सर केेले युरोपातील सर्वोच्च शिखर

नंदुरबार : युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूस चार भारतीयांनी सर करीत इतिहास घडवला आहे. ३६० एक्सप्लोरर टीममार्फत ही कामगिरी झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील बालाघाट, ता. अक्कलकुवा येथील अनिल वसावे याचा या टीममध्ये समावेश होता. भारतीय तिरंगासह या ठिकाणी अनिल वसावे याने संविधानाची प्रतही झळकवली.

कोरोनानंतरची ही पहिलीच भारतीय मोहीम असून एव्हरेस्टवीर, विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती मोहीम यशस्वी करण्यात आली.

अनिल वसावे याने शिखरावर भारतीय संविधानाची प्रतिमा नेऊन आगळावेगळा विक्रम केला आहे. ८ जुलै रोजी पहाटे युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवून हे शिखर सर केले. माउंट एल्ब्रूस हे शिखर युरोपमधील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची उंची १८ हजार ५१० फूट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेले आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डरपासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर आहे. निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरू असलेली मोठ-मोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी आदी माउंट अल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

३६० एक्सप्लोरर टीमने ही मोहीम आयोजित केली होती. हा ग्रुप जगभर साहसी मोहिमांचे आयोजन करत असतो. गेल्या पाच वर्षांत अनेक विश्वविक्रम केले आहेत. अतिशय अवघड व आव्हानात्मक मोहिमांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. युरोप खंडातील सर्वोच्च शिखरांची मोहीम जगभरातील कोविड योद्ध्यांना समर्पित करण्यात आली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बालाघाट या गावातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याने यापूर्वी टांझानियातील किलोमांजरी हे शिखरदेखील सर केले आहे.

Web Title: The highest peak in Europe was climbed by a young man from Satpuda