ध्येयवेड्या सुमित्रा वसावे यांच्या अनोख्या मातृत्वाला सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:32 IST2020-03-08T21:32:36+5:302020-03-08T21:32:51+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कुपोत्रो जायते कस्मात । कुमाता न भवति...।। अर्थातच कुपुत्र जन्माला येऊ ...

Greetings to Sumitra Vasave's unique mother! | ध्येयवेड्या सुमित्रा वसावे यांच्या अनोख्या मातृत्वाला सलाम!

ध्येयवेड्या सुमित्रा वसावे यांच्या अनोख्या मातृत्वाला सलाम!

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘कुपोत्रो जायते कस्मात । कुमाता न भवति...।। अर्थातच कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता मात्र कधीही होऊ शकत नाही. या संस्कृत वचनाचा प्रत्यय जेव्हा वास्तव जीवनात येतो तेव्हा अंगावर रोमांच येतो आणि डोळ्यात अश्रू. अर्थातच अक्कलकुवा येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा वसावे ह्या ध्येयवेडी कार्यकर्तीची ही अनोखी मातृत्व गाथा आहे.
चार वर्षापूर्वीची ही गोष्ट. नंदुरबारमध्ये फिरणाऱ्या एका पीडित मनोरुग्ण महिलेने जंगलातच एका बालिकेला जन्म दिला आणि ही जन्मदाती आई बाळाला जंगलातच सोडून निघून गेली. काही कार्यकर्त्यांनी या बालिकेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. तिचे वजनही कमी होते.
जगण्याची आशाच हरविलेल्या या बालिकेला सुमित्रा वसावे यांनी पाहिले आणि त्या अवस्थेतच तिच्या आयुष्याची जबाबदारी घेत तिने आपल्या घरी नेले. तिची स्वत:च्या मुलीपेक्षाही अधिक काळजी घेतली आणि तिला वाढवले. आज ती चार वर्षाची झाली आहे. तिचे नाव आहे प्रकृती. या प्रकृतीसोबतच सुमित्रा व तिच्या पतीने पूर्ण आयुष्य घालवण्याचे ठरवले असून त्यासाठी या दाम्पत्याने जाणीवपूर्वक स्वत:ला अपत्य न होऊ देण्याची काळजी घेतली आहे.

सुमित्रा वसावे यांनी एमएसडब्ल्यूची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सातपुड्यातील आदिवासींच्या प्रश्नावर चळवळीतून आपले योगदान दिले आहे. सध्या त्या पीडित, शोषित व न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्यायग्रस्त महिलांचे समुपदेशनाचे कार्य करतात. त्यांनी आपले मातृत्व त्यागून दत्तक पुत्रीसाठी जो निर्णय घेतला तो समाजात आदर्शवत ठरत आहे.
४प्रकृती ही २० दिवसांची असतांना तिला सुमित्रा वसावे यांनी घरी आणले. त्यावेळी तिची तब्येत खूपच खालावली होती. अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करून तिला घरी न आणण्याचा सल्ला दिला होता. परंतु सुमित्रांनी त्या बाळाला जीवनदान आणि तिला मातृत्वाचे प्रेम देण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे काही दिवसांच्या प्रयत्नानंतर बाळाची तब्येत सुधारली. पुढे निसर्गानेच या बाळाला त्यांना दिल्याने तिचे नाव ‘प्रकृती’ असे ठेवले.

प्रकृती सोबतचा सहवास खरोखरच उत्साहवर्धक वाटतो असे सुमित्रा वसावे यांचे म्हणने आहे. ती सध्या चार वर्षांची असून अक्कलकुवा येथे प्रि स्कूलमध्ये जाते. ती एक चानाक्ष बुद्धमत्तेची असून कुठलीही गोष्ट तिच्या चांगल्या स्मरणात राहते. तिला मोठे होऊन डॉक्टर होणार अशी ती सहजपणे सांगते. त्यामुळे तिचे स्वप्न पुर्ण करण्याचा सुमित्रा यांनी संकल्प केला आहे.

Web Title: Greetings to Sumitra Vasave's unique mother!