तळोद्यातील आगीत पाच घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:55 IST2020-05-25T11:54:59+5:302020-05-25T11:55:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/तळोदा : वळण रस्त्यावरील दलेलपूर रस्त्याला लागून राहणाऱ्या भरवाड पशुपालकांच्या घरांना लागलेल्या आगीत पाच घरे जळून ...

Five houses were gutted in the fire at the bottom | तळोद्यातील आगीत पाच घरे खाक

तळोद्यातील आगीत पाच घरे खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार/तळोदा : वळण रस्त्यावरील दलेलपूर रस्त्याला लागून राहणाऱ्या भरवाड पशुपालकांच्या घरांना लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. या आगीमुळे पाच पशुपालक कुटुंबाचे अंदाजे ८ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे.
तळोदा शहराबाहेरून दलेलपूरकडे जाणाºया रस्ता व खर्डी नदीला लागून सुमारे ८ ते १० भरवाड पशुपालक कुटुंब राहतात.आज दुपारी एक वाजेचा सुमारास नदीत पडलेला टाकाऊ कचरा पेटविण्यात आला होता. पेटविण्यात आलेला कचरा व पशुपालकांची घरे यातील अंतर खूपच कमी होते. दुपारच्या सुमारास हवेमुळे आगीच्या ठिणग्या पशुपालकांच्या घरावर उडाल्या व त्यामुळे घरांना आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. पशुपालकांच्या घराच्या छतावर व घरात कोरडा चारा असल्याने आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले.
या आगीत रेवा हरी भरवाड, तेजा हरी भरवाड, हमीर हरी भरवाड, रणछोड रेवा भरवाड आणि दाना रेवा भरवाड या पाच जणांची घरे पूर्णपणे जळाली. या आगीत या पाचही कुटुंबियांचे संसारउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागली तेव्हा घरातील प्रमुख व्यक्ती हे गुरे चाररण्यासाठी घेऊन गेले होते व दुपारची वेळ असल्याने घरातील महिला या घराबाहेरील झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मागील बाजूने धुराचे लोळ निघत असल्याचे वालाभाई भरवाड व विकास मगरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घराचे दरवाजे उघडून घरात कुणी आहे का याचा शोध घेतला.
या आगीत पाच कुटुंबीयांचे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्यासह कपाटात व पेटीत ठेवलेले सुमारे ३ ते ४ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच सर्वांचे एकत्रित सुमारे साडे चार ते पाच लाख रुपयांची रोख रक्कम देखील जळाल्याचे सांगण्यात आले. यातील एका कुटूंबाकडे मंगलकार्य होते. त्यासाठी त्यांनी घेतलेले सर्व नविन कपडे व साहित्य आगीत पूर्णपणे जळाले.
दरम्यान, आग लागण्यानंतर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील भरवाड समाजबांधवानी तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली .उशिरापर्यत या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आलेली नव्हती.

तेजा हरी भरवाड या पशुपालकाने शेती घेण्यासाठी दुधाचा व्यवसायातून एक एक रुपया जोडून चार लाख जमविले होते. ती रक्कम त्याने दुधाच्या कॅन मध्ये ठेवली होती. या आगीत अ‍ॅल्युमिनियमचा दुधाचा कॅन अक्षरश: वितळून गेला व त्यातील नोटा जळून राख झाल्या. या आगीमुळे तेजा भरवाड या पशुपालकांची आयुष्यभराची कमाई सोबत शेती घेण्याचे स्वप्न देखिल जळून खाक झाले आहे.

Web Title: Five houses were gutted in the fire at the bottom