केवळ रुग्ण वाढल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:58+5:302021-04-17T04:29:58+5:30

सध्या कोरोनामुळे ओढवलेली परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले आहे. जेणेकरून रुग्ण हळूहळू व कमी संख्येने यावेत व त्यांना ...

Emergency only due to increased patient | केवळ रुग्ण वाढल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती

केवळ रुग्ण वाढल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती

सध्या कोरोनामुळे ओढवलेली परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले आहे. जेणेकरून रुग्ण हळूहळू व कमी संख्येने यावेत व त्यांना ऑक्सिजन व बेड उपलब्ध व्हावेत. या वेळेसचा कोरोना हा झपाट्याने पसरणारा आहे. एकाच घरातील सर्व लोक आजारी पडताना दिसत आहेत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्यामागे कोरोना व्हायरसपेक्षा आपली वागणूकच जास्त कारणीभूत आहे. आजच्या घडीला खालील कारणे कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यात दवाखान्यात एका रुग्णासोबत तीन ते चार नातेवाइकांनी येणे, कोरोना हाॅस्पिटलमध्ये नातेवाइकांचा मुक्त संचार, स्वॅब तपासणी केंद्रावर गर्दी, सिटीस्कॅन सेंटरवरील गर्दी, आदी बाबींचा समावेश आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपणास काहीही त्रास किंवा लक्षणे नसल्यास विनाकारण स्वॅब तपासणी करण्यास जाऊ नये व तेथे गर्दी करू नये. ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा खाली आल्याशिवाय व आपल्या फिजिशियनने सांगितल्याशिवाय सिटीस्कॅन करू नये व कोरोनाला घाबरू नये.

कोरोना झालेल्यांपैकी एकूण ८० टक्के लोकांना काहीही त्रास होत नाही किंवा किरकोळ त्रास होतो व ते आपोआप बरे होतात. १५ टक्के लोकांना मध्यम स्वरूपाचा त्रास होतो व ते तज्ज्ञ फिजिशियनच्या सल्ल्याने पूर्ण बरे होतात. उर्वरित पाच टक्के लोकांना गंभीर आजार होऊन आयसीयूमध्ये ॲडमिट करावे लागते. त्यातील दोन टक्के दगावतात व तीन टक्के वाचतात.

शेवटी महत्त्वाचे म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शन व फॅबीफ्लूच्या गोळ्या ही कोरोनावरचे रामबाण औषधे नाहीत. त्याच्यासाठी वणवण भटकू नये. नाही मिळाले तरी चालेल. रेमडेसिविर इंजेक्शन दिले म्हणजेच जीव वाचेल, असे नाही. आपण व्हॅक्सिन घेतली आहे म्हणजे आपणास कवचकुंडले मिळाली आहेत, असे समजू नये. कोरोनाचे नियम पाळावेत व जबाबदारीने वागावे.

Web Title: Emergency only due to increased patient