कोरोनाने हिरावली सहा महिन्याच्या तान्हुल्याची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:17+5:302021-04-27T04:31:17+5:30

म्हसावद येथील सुनील रोहीदास चौधरी यांची पत्नी स्वाती चौधरी (३१) यांना पंधरा दिवसांपूर्वी ताप आल्यासारखे वाटले. गावातच खासगी दवाखान्यात ...

Corona deprives mother of six-month-old baby | कोरोनाने हिरावली सहा महिन्याच्या तान्हुल्याची आई

कोरोनाने हिरावली सहा महिन्याच्या तान्हुल्याची आई

म्हसावद येथील सुनील रोहीदास चौधरी यांची पत्नी स्वाती चौधरी (३१) यांना पंधरा दिवसांपूर्वी ताप आल्यासारखे वाटले. गावातच खासगी दवाखान्यात दोन दिवस औषधोपचार केले. मात्र ताप कमी न झाल्याने शहादा येथे दवाखान्यात दाखल केले. तेथे त्यांची तपासणी केली असता कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आणि थोडा त्रास वाढल्याने सुरत येथे औषधोपचारासाठी हलवण्यात आले. तेथे दहा दिवस औषधोपचार केला. कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. मात्र शनिवारी रात्री स्वाती चौधरी यांचे अचानक निधन झाले. कलमाडी, ता. शहादा येथील माहेर असलेली स्वाती आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. स्वाती आणि सुनील यांना गुंजन (७ वर्षे), पायल (२ वर्षे) आणि सहा महिन्यांचा तान्हुला पुष्कर नावाचा मुलगा आहे. एक वर्षापूर्वीच सुनील चौधरी यांच्या आई काशिबाई चौधरी यांचे निधन झाले आहे.घराची संपूर्ण जबाबदारी स्वाती चौधरी यांच्यावर आली होती. दोन मुलींनंतर पुष्करचा जन्म झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते मात्र काळाच्या मनात वेगळेच सुरू होते. नशिबाच्या पाटीत लिहिलेले अटळ असते तसेच अनपेक्षित दुःख वाट्याला आले. आई दवाखान्यात असल्याने सहा महिन्याच्या पुष्करला माहेरची आजी म्हसावदलाच सांभाळत होती. त्यातच शनिवारी रात्री स्वाती चौधरीचे निधन झाल्याची बातमी आली आणि चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी सुरत येथेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सासरे, पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. या घटनेने म्हसावद गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Corona deprives mother of six-month-old baby