भररस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:40 IST2021-02-25T04:40:00+5:302021-02-25T04:40:00+5:30

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या आंतरराज्य महामार्गाचा हा महत्त्वपूर्ण भाग असून, येथे मोठ्या प्रमाणात अहोरात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. स्वस्तिक पेट्रोल ...

Chances of an accident as vehicles are parked on the road | भररस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता

भररस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या आंतरराज्य महामार्गाचा हा महत्त्वपूर्ण भाग असून, येथे मोठ्या प्रमाणात अहोरात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. स्वस्तिक पेट्रोल पंप ते शहरात येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला अवजड वाहनांची पार्किंग नियमबाह्यरीत्या केली जात आहे. नियोजित शिवस्मारक परिसरानजीक काही गॅरेज चालकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटला असल्याने या भागात कायम वाहतुकीची कोंडी होते. परिणामी येथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

शहादा शहरातून जाणाऱ्या या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांना संबंधितांनी सूचना देऊन भविष्यातील दुर्घटना टाळण्याची अपेक्षा सुज्ञ वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सोशल मीडियातूनही क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, शहादा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांनी थेट गटारीसह रस्त्यावरच व्यवसायाला प्रारंभ केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेमार्फत शहादा-प्रकाशा रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांसह नियमबाह्यरीत्या अवजड वाहने पार्किंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Chances of an accident as vehicles are parked on the road