उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:46 IST2019-12-28T11:45:44+5:302019-12-28T11:46:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर भारत अशोक राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ शुक्रवारी आयोजित करण्यात ...

Bharati Rajput elected Vice-President | उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड

उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर भारत अशोक राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा त्यांची निवड झाली़ यावेळी वर्षभराचा कार्यकाळ असलेल्या चार स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली़
नगरपालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ प्रसंगी पालिका मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते़ मावळते नगराध्यक्ष परवेज खान यांच्यासह चार स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती़ उपनगराध्यक्ष पदासाठी भारती राजपूत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता़ तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसतर्फे दिलीप राघो बडगुजर, रहेमतउल्ला अमानउल्ला इनामदार, मनोज रामसिंग चव्हाण यांनी तर भाजपाकडून कमल ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता़ या चौघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी विशेष सभेत केली़
दरम्यान सभेवर भाजपाचे केवळ तीनच नगरसेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून ठाकूर यांच्या निवडीचे पत्र दिले गेले़ यामुळे विरोधी गटाच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र सभागृहात दिसून आले़
स्विकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चारही सदस्यांसह उपनगराध्यक्ष भारती राजपूत यांचा पालिका आवारातच सत्कार करण्यात आला़ यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ फटाक्यांसह पुष्पवृष्टी करुन आनंद व्यक्त करण्यात आला़
प्रभाग १९ मधून निवडून आलेल्या भारती राजपूत यांचे त्यांच्या प्रभागातील नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले़

Web Title: Bharati Rajput elected Vice-President