बांधकाम कामगार वगळता इतर कामगारांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:14+5:302021-05-18T04:31:14+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे १६ हजार २८७ बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. या कामगारांना ...

All workers except construction workers wait for government help | बांधकाम कामगार वगळता इतर कामगारांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

बांधकाम कामगार वगळता इतर कामगारांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे १६ हजार २८७ बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. या कामगारांना शासनाकडून लाॅकडाऊनमध्ये दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने ही रक्कम वितरित करण्यात येत आहे. एकीकडे बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळत असताना रिक्षाचालक आणि घरकामगार मात्र योजनेपासून वंचित आहेत.

लाॅकडाऊन काळात बांधकाम, घरकामगार, रिक्षाचालक यांची उपासमार होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने कामगारांच्या खात्यांवर दीड हजार रुपये देण्याचे निश्चित केले होते. यानुसार त्या-त्या विभागांना सूचनाही करण्यात आल्या होत्या. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या बांधकाम कामगार मंडळामार्फत यापूर्वीच नोंदण्या करण्यात आल्याने अनेक कामगारांना लाभ मिळत आहे. दुसरीकडे रिक्षाचालक व घरकामगारांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. रिक्षा चालकांसाठी शासनाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदण्याच झालेल्या नाहीत. याबाबत रिक्षा चालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चाैकशी केली असता, तेथूनही योग्य ती माहिती दिली जात नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घरकामगार महिलांनाही लाभ मिळालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहेे.

याबाबत रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष किरण गवळी यांना संपर्क केला असता, एकाही रिक्षाचालकाला शासनाची मदत मिळालेली नाही. रिक्षाचालकांची उपासमार सुरू झाली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा असल्याचे सांगितले.

Web Title: All workers except construction workers wait for government help