वाळू वाहतुकीच्या २५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:20 IST2020-06-21T12:19:37+5:302020-06-21T12:20:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी घातलेली असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसांनी वाळूची वाहतूक ...

Action on 25 vehicles transporting sand | वाळू वाहतुकीच्या २५ वाहनांवर कारवाई

वाळू वाहतुकीच्या २५ वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी घातलेली असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसांनी वाळूची वाहतूक करणाऱ्या २५ डंपर ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बंदी घातली आहे. असे असताना धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर पोलिसांनी कारवाई करून वाळू भरून वाहतूक करणाºया २५ डंपर ट्रक ताब्यात घेतल्या आहेत. ११ जून रोजी केलेल्या अशाच कारवाईत १३ डंपर ट्रक ताब्यात घेतल्यानंतर ही झालेली दुसरी कारवाई आहे. प्रत्येक डंपर ट्रकमध्ये २० ते २२ टन वाळू भरलेली आहे. तापी नदीच्या गुजरात राज्यातील निर्धारित घाटांमधून वाळूचा उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रासह इतर राज्यात वाळूची वाहतूक केली जाते. कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळूची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. गुजरात राज्यातील निझर येथून नवापूरमार्गे महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व चाळीसगाव याठिकाणी वाळू घेऊन जात असलेल्या २५ डंपर ट्रक राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना जुने सीमा परिवहन तपासणी नाक्याजवळ नवापूर पोलिसांनी ती वाहने अडवून ताब्यात घेतल्यानंतर तहसील कार्यालय आवारात जमा करण्यात आले. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे एकीकडे रस्त्यांची दुरावस्था होत आहे तर वाहनांच्या वाहतुकीचा वेग जास्त असल्याने सामान्य नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. नवापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ११ जून रोजी झालेल्या कारवाईत न्यायालयाकडून दंडात्मक रक्कम वसुलीचे आदेश दिले होते. आजच्या कारवाईत न्यायालयीन आदेशासाठी प्रकरण न्यायालयात समक्ष पाठवण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली होती.

Web Title: Action on 25 vehicles transporting sand