४३ मोटारसायकलींची लागणार विल्हेवाट, मालक आलेच नाहीत घ्यायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:41+5:302021-03-26T04:29:41+5:30

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटारसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या ...

43 motorcycles will have to be disposed of, the owners have not come to collect them | ४३ मोटारसायकलींची लागणार विल्हेवाट, मालक आलेच नाहीत घ्यायला

४३ मोटारसायकलींची लागणार विल्हेवाट, मालक आलेच नाहीत घ्यायला

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटारसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित मालकांना मोटारसायकल घेऊन जाण्यास सांगून ते आले नसल्याने आता एप्रिल महिन्यात या दुचाकींची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

दुचाकी चोरी झाली तर संबंधित जंगजंग पछाडतो. पोलिसांकडे तपासाबाबत चकरा मारल्या जातात. परंतु जेव्हा मोटारसायकल सापडते, तेव्हा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना नाकीनऊ येत असल्याने दुचाकीधारक ती घेऊन जाण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातदेखील गेल्या काही वर्षभरात दाखल विविध गुन्ह्यांतील तब्बल ४३ मोटारसायकली पडून आहेत. त्यांच्या मालकांना त्या घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी कळविण्यातही आले आहे. परंतु संबंधित मोटारसायकल मालक त्या घेण्यासाठी आलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता त्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय उपनगर पोलिसांनी घेतला आहे.

यातील तब्बल २०१५ मध्ये दाखल गुन्ह्यातील दुचाकींचादेखील समावेश आहे. त्यात अनेक महागड्या दुचाकीदेखील आहेत. जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करणे आवश्यक असते; परंतु त्यासाठी विविध कागदपत्रे आणि प्रक्रिया कराव्या लागतात. त्या करतानाच संबंधितांच्या नाकीनऊ येते. त्यापेक्षा ती मोटारसायकल न घेतलेली बरी, अशी मानसिकता होते. त्यामुळेच संबंधित अशा मोटारसायकली घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे. आता अशा दुचाकींची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदवाळकर यांनी सांगितले.

Web Title: 43 motorcycles will have to be disposed of, the owners have not come to collect them