शहाद्यातील रुग्णसेवेसाठी १६ रुग्णवाहिका तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:42+5:302021-04-29T04:22:42+5:30

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. शहादात ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ...

16 ambulances are ready for ambulance service in Shahada | शहाद्यातील रुग्णसेवेसाठी १६ रुग्णवाहिका तत्पर

शहाद्यातील रुग्णसेवेसाठी १६ रुग्णवाहिका तत्पर

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. शहादात ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू लागल्याने उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण नाशिक, धुळे, नंदुरबार, सुरत, बडोदा आदी ठिकाणी जात आहेत. मात्र रूग्णांना बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना कसरत करावी लागत होती. शहरात रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खासगी वाहनाने नातेवाईकांना रुग्णांची सोय करावी लागत असे. आता मात्र शहरात रुग्णवाहिकांची संख्या तब्बल १६ झाल्याने रुग्णांची वेळेवर व कमी खर्चात सोय होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शहादा शहरात पालिकेच्या दोन नव्या रुग्णवाहिकांची भर पडली आहे. तर शहरातील विविध सामाजिक संस्थांनी १४ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्या आहेत. यात गंगोत्री फाउंडेशन, संकल्प गृप, सरदार पटेल फाउंडेशन व सार्थक हाॅस्पिटलच्या प्रत्येकी दोन रुग्णवाहिका आहेत तर पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन, पाटील ॲब्युलन्स सर्व्हिस, सद्दाम तेली फाउंडेशन, महावीर पतसंस्था, भगवती क्रिटिकेअर व रत्नदीप पतसंस्था यांच्या प्रत्येकी एक रुग्णवाहिका आहेत. यात चार रुग्णवाहिका कार्डियाक असून आठ रुग्णवाहिकामध्ये ऑक्सिजनची सोय आहे. विविध संस्थांकडून रुग्णवाहिका सेवा सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रुग्णवाहिका सेवा वाढविणे ही शहराची गरज होती.

शहाद्यातून मोठ्या संख्येने रूग्णांना नाशिक, सुरत, बडोदा या मोठ्या शहरात हलवले जात असल्याने आणि त्यावेळी परिस्थिती हालाखीची असल्याने बऱ्याचदा रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी करुन नातेवाईकांची अडवणूक केली जाते. याकरिता सर्व रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी प्रत्येक ठिकाणचे भाडे जाहीर करावे अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: 16 ambulances are ready for ambulance service in Shahada