मुलीसाठी ५ लाखांत खरेदी केला 'नीट'चा पेपर; नांदेडमध्ये सीबीआयकडून ८ तास घराची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:20 IST2026-05-18T17:01:00+5:302026-05-18T17:20:44+5:30

नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेडच्या एका कुटुंबाची चौकशी करण्यात आली.

NEET Leak Probe CBI Raids Nanded Resident Who Paid Rs 5 Lakh to Buy Paper for Daughter | मुलीसाठी ५ लाखांत खरेदी केला 'नीट'चा पेपर; नांदेडमध्ये सीबीआयकडून ८ तास घराची झाडाझडती

मुलीसाठी ५ लाखांत खरेदी केला 'नीट'चा पेपर; नांदेडमध्ये सीबीआयकडून ८ तास घराची झाडाझडती

NEET Paper Leak: ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकाने आता लातूर, पुणे पाठोपाठ नांदेडमध्येही मोठी कारवाई केली आहे. नांदेडच्या विद्युत नगर भागातील रहिवासी असलेल्या भाऊराव कदम यांच्या घरावर सीबीआयने अचानक छापा टाकला. सकाळी सुरू झालेली ही शोधमोहीम तब्बल ८ तास चालली. तपास अधिकाऱ्यांनी संपूर्ण फ्लॅटची कसून झडती घेतली, अनेक महत्त्वाची कागदपत्रे तपासली आणि बँक व्यवहारांचे रेकॉर्ड्सही जप्त केले आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, भाऊराव कदम यांनी आपल्या मुलीला परीक्षेपूर्वीच लीक झालेली प्रश्नपत्रिका मिळावी, यासाठी दलालांना ५ लाख रुपये मोजले होते. हा पेपर कधी मिळाला? तो कोणी पुरवला? आणि ५ लाख रुपयांचा हा आर्थिक व्यवहार नेमका कसा आणि कोणामार्फत झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सीबीआयने भाऊराव कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही तासनतास चौकशी केली. या छाप्यानंतर सीबीआयने कदम कुटुंबियांना पुढील चौकशीसाठी पुणे कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे-लातूर-नांदेड

सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात पुणे, लातूर आणि नांदेड या तीन शहरांना जोडणारी एक मोठी साखळी समोर आली आहे. कोचिंग क्लासेसचे संचालक, शिक्षक आणि एजंट्स मिळून पालकांकडून लाखो रुपये उकळत होते आणि त्यांना परीक्षेआधीच पेपर पुरवत होते, असा संशय आहे. लातूरमध्ये कोचिंग संस्था चालवणाऱ्या संचालकांच्या चौकशीनंतर आता सीबीआय पैसे देणाऱ्या पालकांकडे वळली आहे.

राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली होती. परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांमध्ये फिरत असलेल्या एका गेस पेपरमधील तब्बल १४० प्रश्न मुख्य परीक्षेशी हुबेहूब जुळत होते. ७२० गुणांपैकी तब्बल ६०० गुणांचे प्रश्न आधीच लीक झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या संपूर्ण परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

महाराष्ट्र ते राजस्थान कनेक्शन

या पेपरफुटीचा माग काढत असताना सीबीआयला याचे धागेदोरे महाराष्ट्रातून थेट राजस्थानच्या सीकरपर्यंत सापडले. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत एका निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापकाला आणि एका बॉटनीच्या प्राध्यापकाला अटक केली आहे, जे पैशांच्या बदल्यात पेपर गोळा करून तो पुढे पास करत होते. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधीलच काही वरिष्ठ अधिकारी सामील असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आतून मदत पुरवल्या शिवाय पेपर बाहेर येणे अशक्य असल्याने सीबीआय सखोल तपास करत आहे.

दरम्यान, या परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने ही परीक्षा रद्द केली असून, आता २१ जून २०२६ रोजी पुन्हा एकदा नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
 

Web Title : NEET पेपर लीक: सीबीआई ने नांदेड में छापा मारा, ₹5 लाख कथित तौर पर दिए गए

Web Summary : सीबीआई ने नांदेड में NEET पेपर लीक की जांच करते हुए एक घर पर छापा मारा। एक पिता ने कथित तौर पर अपनी बेटी के लिए पेपर पाने के लिए ₹5 लाख दिए। जांच में पुणे, लातूर और नांदेड जुड़े हैं, कोचिंग सेंटरों की संलिप्तता का संदेह है। पुन: परीक्षा 21 जून को निर्धारित है।

Web Title : NEET Paper: CBI Raids Nanded Home, ₹5 Lakh Allegedly Paid

Web Summary : CBI raided a Nanded home, investigating a NEET paper leak. A father allegedly paid ₹5 lakh for his daughter to get the paper. The probe links Pune, Latur, and Nanded, suspecting coaching centers' involvement. Re-exam scheduled June 21st.