महिलेची दीड लाख रुपयांनी फसवणूक

By Admin | Updated: April 20, 2016 03:17 IST2016-04-20T03:17:08+5:302016-04-20T03:17:08+5:30

निनावी फोन कॉलवर विश्वास ठेवत महिलेने त्यांच्याकडील एटीएम कार्डची संपूर्ण गोपनीय माहिती दिली.

Woman gets cheated by 1.5 lakh rupees | महिलेची दीड लाख रुपयांनी फसवणूक

महिलेची दीड लाख रुपयांनी फसवणूक

आॅनलाईन खरेदी :
निनावी फोनवर विश्वास ठेवणे अंगलट

हिंगणा : निनावी फोन कॉलवर विश्वास ठेवत महिलेने त्यांच्याकडील एटीएम कार्डची संपूर्ण गोपनीय माहिती दिली. सदर व्यक्तीने सहा दिवसांत आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून त्या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांची उचल केली. हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा येथे नुकताच घडला.
मनीषा महेश ढगे (३०, रा. जामठा) यांचे बँक आॅफ इंडियाच्या खापरी शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या पतीच्या मोबाईलवर रविवारी (दि. ३) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ९५२५१३५५१३ क्रमांकाच्या मोबाईलवरून कॉल आला. हा कॉल मनीषा ढगे यांनी ‘रिसिव्ह’ केला. आपण बँकेच्या एटीएम आॅफिसमधून एटीएम आॅफिसर बोलत असल्याचे त्याने बतावणी केली. तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. ते चालू करावयाचे आहे काय, अशी विचारणा केली. त्यासाठी एटीएम कार्ड क्रमांक व पिन नंबर सांगण्याची सूचना केली.
ढगे यांनी या फोन कॉलवर विश्वास ठेवत एटीएम कार्ड क्रमांक व पिन नंबर त्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर ३ एप्रिल ते ८ एप्रिल या काळात त्या व्यक्तीने आॅनलाईन खरेदीच्या माध्यामातून ढगे यांच्या खात्यातून १ लाख ४५ हजार रुपयांची उचल केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
निनावी फोनद्वारे माहिती विचारून बँक खातेदारांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे खातेदारांनी त्यांच्या बँक खाते, एटीएम कार्ड क्रमांक, पीन नंबर याबाबतची गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कधीही देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वांदिले करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Woman gets cheated by 1.5 lakh rupees