भारतीय सैन्य ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:17 IST2025-05-14T11:15:33+5:302025-05-14T11:17:46+5:30
Nagpur : पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली

What was the need to bow down when the Indian Army was in power? Vijay Vadettiwar's question
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत अमेरिकेपुढे का झुकला, हा प्रश्न विचारला जात आहे. निवडणुकापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले, त्याच पद्धतीने बोलावे, अशी अपेक्षा भारतीयांची होती. जनतेत विश्वासावरून विश्वासघाताची भावना वाढायला लागली आहे. भारतीय सैन्य इतके ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान वारंवार भाषणात पाकिस्तानचे नाव घेत होते त्या चिल्लर देशाला एवढा भाव देण्याची गरज होती. पंतप्रधानांचे भाषण अमेरिकेला इशारा देणारे असायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही, असे वाक्य आले असते तर बरे वाटले असते. आधी ट्रम्पचे भाषण झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाले. आपण पाकिस्तानात घुसायला पाहिजे. आपले सैन्य ताकदवर आहे. सैन्यांना अधिकार दिले होते त्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे होते. परंतु पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली, अशी टीका त्यांनी केली. फळबागा भाजीपाला धान नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई घोषित करावी. नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफ आणि एचडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्राकडे मागणी करून मदत मिळवून शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.