Vidarbha plays ready for amateur state drama competition | हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज
हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज

ठळक मुद्देतब्बल ९३ प्रवेशिका सांस्कृतिक संचालनालयाकडे सादरसर्वाधिक २६ नाट्यसंघ नागपूरचे हिंदीभाषी प्रदेशातूनही मराठी स्पर्धक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसोबतच हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी संगीतनाट्य स्पर्धेसाठी वैदर्भीय नाटुकल्यांनी आपली तयारी सुरू केली असून, यंदा स्पर्धकांचा आकडाही वाढला असल्याचे स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.
कधी काळी ५० च्या वर स्पर्धक संख्या जात नसणाऱ्या विदर्भातून यंदा तब्बल ९३ प्रवेशिका संचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट रोजी संचालनालयाकडून स्पर्धेची घोषणा करण्यात आल्यानंतर स्पर्धक नाट्य संघांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. प्रथम ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठवायच्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक भागात महापुराची स्थिती निर्माण झाल्यानंतर, ही मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याअनुषंगाने, १६ सप्टेंबरपर्यंत ज्या स्पर्धक संघांनी प्रवेशिका भरून पाठविल्या आहेत आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे ज्या प्रवेशिका पोहोचल्या नाहीत, त्यांनाही स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असल्याचे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषत: मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि अन्य ठिकाणाहून काही प्रवेशिका तिकडील पूरस्थितीमुळे संचालनालयापर्यंत पोहोचत्या झाल्या नसल्याने, त्यांची स्थिती गृहित धरून त्यांच्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवेशिकांचा आकडा शंभरच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, विदर्भातून सर्वाधिक प्रवेशिका नागपूरमधून प्राप्त झाल्या आहेत. मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी आतापर्यंत ६५ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, त्यात एकट्या नागपूरच्या २६ प्रवेशिकांचा समावेश आहे.
हौशी मराठीसाठी ६५ प्रवेशिका
५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी साधारणत: १५ नोव्हेंबरपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती व अकोला या केंद्रांवर रंगणार आहे. यासाठी ६५ प्रवेशिका आतापर्यंत प्राप्त झाल्या असून, त्यात भोपाळ व इंदूरमधून आणखी पाच-सहा प्रवेशिकांची भर पडणार आहे. साधारणत: ७० च्या वर नाटके प्राथमिक फेरीत सादर होतील. यात आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातून २६, अकोला येथून ८, यवतमाळ येथून ८, अमरावती येथून ७, चंद्रपूर येथून ५, बुलडाणा येथून ५, वर्धा येथून ३, वाशीम येथून १, भोपाळ येथून १ व इंदूर येथून १ अशा एकूण ६५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. नागपूरची आकडेवारी बघता, नागपूर केंद्रावर संपूर्ण नागपूरच्याच नाट्य संघांची प्राथमिक फेरी रंगेल, अशी शक्यता आहे. इतर नाट्य संघांना चंद्रपूर, अमरावती व अकोला केंद्रांवर स्पर्धेत उतरावे लागेल. यासोबतच, हिंदी नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातून २१, संस्कृतसाठी ५, संगीत नाट्य स्पर्धेसाठी २ प्रवेशिका नागपूर विभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय, बालनाट्य स्पर्धेसाठी ५ प्रवेशिका आल्या आहेत. बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असल्याने, प्रवेशिका येणे सुरूच आहे.
अंतिम फेरीसाठी आठ संघ!
संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये केवळ हौशी मराठी आणि बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी होत असते. हिंदी, संस्कृत आणि संगीत नाटकांची स्पर्धा थेट होत असते. हौशी मराठी स्पर्धेसाठी आतापर्यंत ६५ संघांची प्रवेशिका आल्या असून, त्यात साधारणत: पाच-सहा संघ आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, यंदा विदर्भातून प्राथमिक फेरीतून अंतिम फेरिसाठी आठ नाटके निवडली जाण्याची शक्यता आहे. साधारणत: १५ संघांच्या स्पर्धेतून एक नाटक अंतिमसाठी द्यावे, असा नियम आहे. त्यावर संख्या वाढली तर दोन नाटके अंतिमसाठी पाठविण्यात येत असतात. एकट्या नागपूरमध्ये यंदा २६ प्रवेशिका असल्याने, एक तर नागपूरची प्राथमिक फेरी दोन सत्रात पार पडेल किंवा येथील काही नाटके दुसऱ्या केंद्रांवर वळते केली जाऊ शकतात. अशास्थितीतही नाटकांची संख्या अधिक असल्याने, चारही केंद्रांवरून दोन-दोन नाटके अंतिम फेरीत जाण्याची शक्यता बळावली आहे.

Web Title: Vidarbha plays ready for amateur state drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.