विद्यार्थ्यांमधील ‘संशोधक’ शोधणार विद्यापीठ

By Admin | Updated: February 1, 2015 00:54 IST2015-02-01T00:54:33+5:302015-02-01T00:54:33+5:30

यंदाच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये प्रथमच सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक नवीन सुरुवात केली आहे. यानंतर विद्यापीठाकडून आणखी दमदार प्रतिनिधित्व व्हावे

University seeks 'researchers' for students | विद्यार्थ्यांमधील ‘संशोधक’ शोधणार विद्यापीठ

विद्यार्थ्यांमधील ‘संशोधक’ शोधणार विद्यापीठ

‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’पासून प्रेरणा : विभागांकडून मागविणार संशोधनाची माहिती
नागपूर : यंदाच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये प्रथमच सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक नवीन सुरुवात केली आहे. यानंतर विद्यापीठाकडून आणखी दमदार प्रतिनिधित्व व्हावे याकरिता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार विद्यापीठ स्तरावर संशोधन स्पर्धा आयोजित करून यातील निवडक व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प व ‘मॉडेल’ ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’ला पाठविण्यात येण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रथमच सहभागी होत असताना मिळालेल्या प्रतिसादामुळे विद्यापीठात उत्साह संचारला असल्याची भावना प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी व्यक्त केली.
जानेवारी महिन्यात मुंबई येथे घेण्यात आलेल्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये विद्यापीठाच्या सहभागाबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व सहभागी झालेले प्राध्यापक-विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शनिवारी दीक्षांत सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये प्रयोग सादर करणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ होते. विद्यापीठाकडून अगदी वेळेवर याची तयारी करण्यात आली होती. तरीदेखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प सादर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. सात पोस्टर व सहा लाईव्ह मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. देशभरातील विविध तज्ज्ञ, संशोधक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रयोगांचे कौतुक केले होते. विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असल्याचे मत डॉ.देशपांडे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाकडून या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’ला डॉ.अनिल हिरेखन, गणेश कुंकुमवार, डॉ.सुधार बन्सोड यांनी सहभागी प्रतिनिधींना मोलाचे सहकार्य केले.(प्रतिनिधी)
नागपुरात आयोजनाचा प्रयत्न
‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’चे वेळापत्रक तीन वर्ष अगोदरपासून ठरले असते. त्यामुळे तीन वर्षांनंतर नागपूर विद्यापीठात याचे आयोजन करण्यासंदर्भात प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध संशोधन प्रकल्पांचे रमण विज्ञान केंद्र येथे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: University seeks 'researchers' for students