कमल शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने तुर्कस्थानने दिलेल्या ड्रोनने भारतावर हल्ले केले. भारतीय हवाई दलाने ते हल्ले हवेतच हाणून पाडले. मात्र, ज्या कंपनीने हे ड्रोन बनवले, त्या एसिस गार्ड कंपनीशी संबंध असलेल्या एसीस इलेक्ट्रॉनिक या तुर्कीच्या कंपनीला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांमध्ये तिकीट प्रणालीशी संबंधित काम मिळाले असून कंपनी अजूनही हे काम करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, सरकार या प्रकरणाची चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेश सरकारकडून कामाचा आढावा सुरू
पाकिस्तानने तुर्की कंपनीच्या ड्रोनचा वापर करून भारतावर हल्ला केला हे उघडकीस आल्यानंतर भारतात तुर्कस्थानाविरुद्ध संताप आहे. या देशावर सर्वत्र बहिष्कार टाकला जात आहे. फळांची आयात थांबली आहे. पर्यटकांनीही तुर्कस्थानला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
७० टक्क्यांहून अधिक टूर बुकिंग रद्द झाली आहेत. अशात, पाकसाठी ड्रोन बनवणाऱ्या एसिस गार्डशी संबंधित एसिसला भारतात दिलेल्या कंत्राटांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडेच, मध्य प्रदेश सरकारने भोपाळ आणि इंदूर मेट्रो प्रकल्पांना दिलेल्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, एसीस गार्ड आणि एसीस इलेक्ट्रॉनिक यांच्यातील संबंधांची चौकशी केली जात आहे.
कोणते काम करते एसिस कंपनी?
पुणे आणि मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पात एसीस इलेक्ट्रोनिक ‘ऑटोमेटेड फेअर कलेक्शन’चे काम करत आहे. येथे कंपनी तिकीट कार्ड आणि क्यूआर कोड तिकीट प्रणालीच्या पायाभूत सुविधांच्या विकासावरही काम करत आहे. कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय सेनापती बापट मार्ग, दादर, मुंबई येथे आहे. याशिवाय, कंपनी एचडीएफसी बँक आणि पेक्रॉफ्ट सोल्युशन्ससोबतही काम करत आहे.
सेलेबीच्या याचिकेवर निकाल राखून : भारत सरकारने १५ मे रोजी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाची सुरक्षा मंजुरी रद्द केली. त्याविरोधात कंपनीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.