मैत्रिणीने दरवाजा उघडला अन् समृद्धीला बघून धक्काच बसला; एम्समधील विद्यार्थिनीने मृत्युला का कवटाळलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:47 IST2025-11-14T13:46:27+5:302025-11-14T13:47:01+5:30
Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला.

The friend opened the door and was shocked to see Samruddhi; Why did the AIIMS student embrace death?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'एम्स'मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. संबंधित मुलगी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे 'एम्स'मध्ये खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
समृद्धी कृष्णकांत पांडे (२५, मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. ती 'एम्स'मध्ये त्वचारोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती तिच्या एका मैत्रिणीसोबत संबंधित फ्लॅटमध्ये राहत होती. दोघीही एकाच विभागात शिक्षण घेत होत्या व २५ जुलैपासून सोबत राहत होत्या. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण 'एम्स'मध्ये सकाळी ७:५० वाजता गेली. त्यावेळी समृद्धी घरी एकटीच होती. तिची मैत्रीण रात्री आठ वाजता घरी परत आली तेव्हा फ्लॅटचा दरवाजा लॉक होता. तिच्या मैत्रिणीने तिच्याजवळील चावीने दरवाजा उघडला आणि तिला धक्काच बसला. समृद्धी डीआयजी पांडे यांच्या मुलीची आत्महत्या हॉलमध्येच कथ्या रंगाच्या ओढणीने सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोकदेखील गोळा झाले. त्यातील कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. समृद्धीचे वडील व कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचे वडील कृष्णकांत पांडे हे पुणे येथे 'सीआरपीएफ'चे उपमहानिरीक्षक आहेत. अनेक नक्षल प्रभावित भागात तसेच जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले आहे. त्यामुळे समृद्धीदेखील मानसिकदृष्ट्या कणखर होती. तिने असे पाऊल उचलल्याने तिचे कुटुंबीयदेखील मोठ्या धक्क्यात आहेत.
फोन न उचलल्याने वडिलांना आली शंका
कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. पांडे व त्यांचे कुटुंबीय नागपुरात पोहोचले आहेत.
अभ्यासात हुशार असलेली समृद्धी होती तणावात
समृद्धी पांडे ही अभ्यासात हुशार होती. मात्र, काही दिवसांपासून ती तणावात होती. तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तपास सुरू आहे. मात्र, अद्याप कारण समोर आलेले नाही.
'एम्स'मधील विद्यार्थी तणावात का?
याअगोदर 'एम्स'च्या वसतिगृहातील संकेत दाभाडे (२२, जिंतूर, परभणी) याने ऑगस्ट महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्यांना नेमका कोणता तणाव होता, असा सवाल आता या आत्महत्यांमुळे उपस्थित होत आहे.