चांदीची एका दिवसात १४ हजारांची उसळी; नागपुरात किलोचा दर २.८६ लाखांवर.. गुंतवणुक करावी का?
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 14, 2026 20:33 IST2026-01-14T20:31:38+5:302026-01-14T20:33:09+5:30
Nagpur : सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही आता दरवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात अवघ्या चार दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ३२ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली असून, हा दर ३ टक्के जीएसटीसह २,८६,४४३ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

Silver jumps by 14 thousand in a day; Price per kg in Nagpur at 2.86 lakhs.. Should you invest?
नागपूर : सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही आता दरवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात अवघ्या चार दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ३२ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली असून, हा दर ३ टक्के जीएसटीसह २,८६,४४३ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. लवकरच ३ लाखांची पातळी गाठण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एकाच दिवसात चांदीत किलोमागे १४,१०० रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली. दरवाढीची आकडेवारी पाहता नववर्षात केवळ जानेवारी महिन्यातच चांदीत तब्बल ५०,८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीच्या या वेगामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.
का वाढताहेत चांदीचे दर?
चांदीच्या या ‘रॉकेट’ वेगामागे केवळ गुंतवणूक नाही, तर अनेक जागतिक आणि औद्योगिक कारणे कारणीभूत आहेत. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. जगभरात ‘ग्रीन एनर्जी’वर भर दिला जात असल्याने चांदीची मागणी औद्योगिक स्तरावर प्रचंड वाढली आहे.
मागणीच्या तुलनेत जागतिक स्तरावर चांदीचा पुरवठा मर्यादित आहे. खाणींमधून होणारे उत्पादन संथ असल्याने बाजारात तुटवडा जाणवत आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि वाढत्या महागाईपासून संरक्षण म्हणून गुंतवणूकदार आता सोन्यासोबतच चांदीला प्राधान्य देत आहेत. अनेक दिवसांपासून चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत कमी होते. आता ही तफावत भरून काढण्यासाठी चांदीमध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे.
नागपूरच्या बाजारातील स्थिती नागपूर हे मध्य भारतातील सोने आणि चांदीच्या व्यापाराचे मोठे केंद्र आहे. येथील बाजारात झालेली ही मोठी वाढ लग्नसराईच्या काळात ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
गुंतवणुकदारांसाठी ‘सुवर्णयोग’
चांदी आता केवळ दागिने बनवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. औद्योगिक वाढ आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी या दोन इंजिनांमुळे चांदीच्या दरात ही अभूतपूर्व तेजी पाहायला मिळत असली, तरी गुंतवणूकदारांसाठी मात्र चांदी ‘सुवर्णयोग’ ठरत आहे.
राजेश रोकडे, चेअरमन, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल (जीजेसी).