धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक
By नरेश डोंगरे | Updated: January 10, 2026 20:06 IST2026-01-10T20:04:22+5:302026-01-10T20:06:22+5:30
Nagpur : रेल्वेचा अपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले.

Shocking.. 294 people were crushed by railway trains in a year; The statistics of crushing animals are shocking
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वेचाअपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले. त्यातील चार मोठ्या अपघातात ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आणि ५० जण जबर जखमी झालेत. मात्र, याहीपेक्षा खतरनाक आकडेवारी आहे, दुसऱ्या रेल्वे अपघातांची. अर्थात रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या नाही मात्र गेल्या वर्षभरात रेल्वेने विविध मार्गावर २९४ व्यक्तींना चिरडले. त्याचप्रमाणे रेल्वेची धडक बसल्याने ४८६ मुक्या जनावरांचेही बळी गेले. काळजाचे पाणी करणारी ही आकडेवारी एकट्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची आहे. या अपघाताने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांनाही धडकी भरली आहे.
२०२५ मधील प्रमुख रेल्वे अपघात
बिलासपूर रेल्वे अपघात (४ नोव्हेंबर २०२५): छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ एक मेमू पॅसेंजर ट्रेन उभ्या असलेल्या मालगाडीला मागून धडकली. या भीषण अपघातात किमान डझनभर व्यक्तींचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले होते.
जळगाव रेल्वे दुर्घटना (२२ जानेवारी २०२५) : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आग लागल्याच्या अफवेवरून अनेकांनी ट्रेनमधून खाली उडी मारल्या होत्या. त्याचवेळी बाजुच्या ट्रॅकवरून वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिल्याने किमान १३ जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबई लोकल अपघात (९ जून २०२५) : मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले होते.
बिहार मालगाडी रुळावरून घसरली (२७ डिसेंबर २०२५) : बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लाहाबन आणि सिमुलतला स्थानकांदरम्यान मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
रेल्वेने धडक दिल्यामुळे मृत झालेल्यांची आकडेवारी
"निश्चिंतच थरारक आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दलाकडून सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणाऱ्या गावांगावांतील नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी जनजागरण केले जाणार आहे. ट्रॅक शेजारी जनावरांना चरण्यासाठी नेऊ नये, असे आवाहनही त्यांना केले जाणार आहे."
- दीपचंद्र आर्य, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल (एसईसीआर), नागपूर