योगेश पांडे, नागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर पोलिसांतर्फे गठीत ‘एसआयटी’ने आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी (23 मे) अटक करण्यात आली. या घोटाळ्यात अटक झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. गुरुवारीच (२२ मे) पोलिसांनी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनादेखील अटक केली होती. (shalarth id scam Latest Update)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी-कर्मचारी तसेच एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती.
मंघामने सांगितली मोठ्या अधिकाऱ्यांची नावे
सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने तीन दिवसांअगोदर लक्ष्मण उपासराव मंघाम (४७, वासंती अपार्टमेंट, आकांशी ले-आउट, दाभा) याला अटक केली होती. तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता. २०१९ सालापासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. यासाठी तो कार्यालयाच्या बाहेरील संगणकांचा वापर करत होता.
वाचा >>नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
त्याच्या चौकशीत त्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेतली. दोन दिवसांतच चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली. तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथून वैशाली जामदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना चौकशीसाठी नागपुरात आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे आता राज्यभरातील अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, चिंतामण वंजारीला २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.