लोकांचे जीव वाचवायचेत, आधी रुग्णालये सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:43+5:302021-04-20T04:07:43+5:30

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत चार प्राथमिक आरोग्य केंद्र : कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागपूर : ग्रामीण भागातील आरोग्याची परिस्थिती ...

To save lives, start hospitals first | लोकांचे जीव वाचवायचेत, आधी रुग्णालये सुरू करा

लोकांचे जीव वाचवायचेत, आधी रुग्णालये सुरू करा

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत चार प्राथमिक आरोग्य केंद्र : कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी

नागपूर : ग्रामीण भागातील आरोग्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णालये अपुरी पडत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये जागा राहिलेली नाही. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पडून असलेल्या ४ इमारती सहजतेने उपलब्ध आहेत. अशा स्थितीत या इमारतींच्या उद्घाटनाची प्रतीक्षा न करता ताबडतोब त्यांचा उपयोग करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. ३२ कोटी रुपये खर्चून, लक्ष वेधून घेणाऱ्या इमारती २०१७ मध्ये पूर्ण झाल्या. सध्या या भव्यदिव्य इमारती धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे अजूनही या इमारती बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. कामठी तालुक्यात भूगाव, मौदा येथे धानला, नरखेड भिष्णूर व नागपूर ग्रामीणमध्ये सालई गोधनी येथे ही आरोग्य केंद्रे आहेत.

शासनाने या चारही आरोग्य केंद्रांकरिता ५ नियमित पदे मंजूर केली आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंत्राटी भरण्याचे निर्देश आहेत. पण अडचण कुठे आहे, हे नेमके कळले नाही. धूळ खात पडून असलेल्या इमारतींचा कोरोनाच्या उपचारासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

नेत्यांच्या अट्टाहासापोटी उद्घाटन लांबले

जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असताना इमारती बनून तयार झाल्या होत्या. इमारतींचे उद्घाटन नेत्यांच्या हस्ते करण्याचा मानस तत्कालीन अध्यक्षांनी बाळगला होता. परंतु त्यांना नेत्यांची वेळच मिळाली नाही. तसेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर कोरोना पसरल्याने इमारती उद्घाटनाविनाच राहिल्या.

- इमारत तयार आहे. फर्निचर लागलेले आहे. फक्त मनुष्यबळ लावून आरोग्य केंद्र सुरू करता येऊ शकते. आज दीड वर्ष झाले, इमारतीचा उपयोग नाही. सध्या लसीकरणासाठी त्याचा वापर केला आहे. पण कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, हे केंद्र सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- दिनेश जवंजाळ, रहिवासी, भिष्णूर

- ग्रामीण भागात आरोग्याची पुरेशी व्यवस्था नाही. पण जिथे सर्व यंत्रणा तयार आहे, त्याचा उपयोग करून घेणे प्रशासनाचे काम आहे. यथास्थितीत या इमारतींचा उपयोग करायला हवा. पुढे येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल. पण परिस्थिती लक्षात घेता, त्याचा उपयोग करायलाच हवा.

- शरद डोणेकर, माजी उपाध्यक्ष

- या इमारतींचा उपयोग करायचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पण आरोग्य विभागात स्टाफची कमतरता आहे. कंत्राटीवर आम्ही मनुष्यबळ घेण्यासाठी जाहिरातीही दिल्या. पण मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. आमचा आरोग्यचा अर्धा स्टाफ क्वारंटाईन आहे. थोडे थांबावे लागेल.

- रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि. प.

Web Title: To save lives, start hospitals first