सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गडकरी वाड्यावर मोर्चा

By Admin | Updated: August 22, 2016 02:49 IST2016-08-22T02:49:59+5:302016-08-22T02:49:59+5:30

असंघटित क्षेत्रात काम करणारे ५४ लाख सेवानिवृत्त कर्मचारी व भविष्यात निवृत्त होणारे १६ कोटी कर्मचारी यांचा विचार करता,

A retired staff member on Gadkari wad | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गडकरी वाड्यावर मोर्चा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गडकरी वाड्यावर मोर्चा

दहा हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर : असंघटित क्षेत्रात काम करणारे ५४ लाख सेवानिवृत्त कर्मचारी व भविष्यात निवृत्त होणारे १६ कोटी कर्मचारी यांचा विचार करता, सरकारने भगतसिंग कोशियारी कमिटीच्या तरतुदी लागू करून ई.पी.एस. ९५ च्या कायद्यात त्वरित सुधारणा करावी, यासाठी देशभरातून नागपुरात एकत्रित झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढला होता.
देशभरातील विविध राज्यातून १० हजारावर निवृत्त कर्मचारी चिटणीस पार्क मैदानावर जमले होते. वाढती महागाई आणि खासगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे निवृत्ती वेतन ताळमेळच बसत नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ई.पी.एस. १९९५ च्या कायद्यात गेल्या २१ वर्षापासून सुधार झालेला नाही. खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने भगतसिंग कोशियारी कमिटीची स्थापना केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या दरबारातही आवाज पोहचविला. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी कोशियारी कमिटीच्या शिफारशी सत्तेत आल्यानंतर ९० दिवसाच्या आत लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु नेत्यांनी आश्वासनाकडे पाठ फिरविली.
रविवारी देशभरातून १० हजारावर कर्मचारी नागपुरात पोहचले. त्यांनी मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून चिटणीस पार्कमध्ये मोर्चा वळविला. निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे व महासचिव प्रकाश पाठक यांच्या नेतृत्वात १० कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने गडकरी यांना निवेदन दिले. गडकरींनी त्यांना समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर चिटणीस पार्कमध्ये सभा घेण्यात आली. सभेला ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे हे उपस्थित होते. अणे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांचे सरकारकडे हजारो कोटी रुपये जमा आहे. मात्र सरकार पैसे वाटायला बसलेले नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी दबाव वाढविणे गरजेचे आहे आणि संघर्षाशिवाय ते शक्य नाही. या मेळाव्याला औरंगाबाद जिल्ह्याचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष देवकर यांच्या नेतृत्वात ५५० कर्मचारी उपस्थित झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: A retired staff member on Gadkari wad