सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

By गणेश हुड | Published: January 10, 2024 08:13 PM2024-01-10T20:13:30+5:302024-01-10T20:13:50+5:30

विद्यार्थ्यांचे नुकसान : अर्धेसत्र संपले परंतु शिक्षक मिळाले नाहीत

retired reluctant; The problem of filling up the vacancies of teachers continues | सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

नागपूर :  राज्य सरकारच्या सूचनानुसार जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची मानधनावर नियुक्तीची प्रक्रीया राबवली जात आहे. यासाठी २०२  सेवानिवृत्त शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातील  १७५ अर्ज पात्र ठरले आहे. परंतु नियुक्तीपूर्वीच्या समुपदेशनाला १२२ सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षकांपैकी अनेक जण दुर्गम व नागपूर शहरापासून लांब अंतरावरील शाळांवर जाण्यास इच्छूक नसल्याने या भरतीनंतरही  शिक्षकांच्या रिक्त जागांचा तिढा कायम आहे.

जिल्ह्यात जि.प.च्या शाळांसाठी सुमारे साडेचार हजार शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यातील ९५० पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने बरीच ओरड झाल्यानंतर  सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांतून कंत्राटी शिक्षकांची पदभरती करण्याच्या सूचना केल्या. कंत्राटी शिक्षकाला दरमहा २० हजार रुपये मानधनावर देण्याचे निश्चितही झाले. परंतु नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा व सेवानिवृत्तांची करण्यात आलेली निवड याचा विचार करता सेवानिवृत्त शिक्षक या भरतीसाठी अनुच्छूक असल्याचे दिसून येते. 

एकट्या रामटेक तालुक्यात शिक्षकांची ९४ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने दुर्गम भागातील शाळांचा समावेश आहे. पेन्शनधारक शिक्षक २० हजार रुपयाच्या मानधनासाठी दुर्गम भागात वास्तव्यास जातील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अर्ध्याहून अधिक शैक्षणिक सत्र संपले आहे. परंतु शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: retired reluctant; The problem of filling up the vacancies of teachers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.