Resolve the issue of water in restricted areas immediately | प्रतिबंधित क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा

प्रतिबंधित क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित आहे. या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्रातील नागरिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. यावर उपाययोजन करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष तथा जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिले.
गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या झोनमधील पाणी समस्येचा झलके यांनी सोमवारी झोननिहाय आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, झोन सभापती वंदना येंगटवार, अभिरुची राजगिरे, नगरसेविका आभा पांडे, यशश्री नंदनवार, नगरसेवक प्रदीप पोहाणे, दीपराज पार्डीकर, पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, संजय चावरे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, तीनही झोनचे सहायक आयुक्त, ओसीडब्ल्यूचे अधिकारी व तीनही झोनचे डेलिगेट प्रामुख्याने उपस्थित होते.
सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लकडगंज भागामध्ये बहुतांशी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र अपुऱ्या टँकरच्या संख्येमुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यावर गांभीर्याने दखल घेत झलके यांनी लकडगंज झोनमध्ये तातडीने टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा झोनमध्येही पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

Web Title: Resolve the issue of water in restricted areas immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.