लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ठिकठिकाणी असलेल्या रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंग (रस्त्याच्या मध्ये) गेटवर यापुढे एकही अपघात होऊ द्यायचा नाही, असे धोरण रेल्वेने आखले आहे. त्यानुसार, ठिकठिकाणच्या क्रॉसिंग गेटवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून विशेष सुरक्षा मोहीम राबविली जात आहे.
ठिकठिकाणच्या गाव, शहर आणि वसाहतींमधून गेलेल्या रेल्वे लाइनच्या ठिकाणी रेल्वेने क्रॉसिंग गेट उभारले आहे. रेल्वेगाडी येण्याच्या पाच मिनिटांपूर्वी हे गेट बंद केले जाते. त्यामुळे गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या, नागरिकांच्या रांगा लागतात. अशा वेळी काही जण गेटच्या दंड्याखालून जाऊन क्रॉसिंग गेट पार करतात. दुचाकीधारकांचा त्यात समावेश असतो. त्यांच्या या आगाऊपणामुळे अपघात होण्याची शक्यता असते. या अपघातामुळे नागरिकांसोबतच प्रशासनालाही त्रास होतो. ते रोखण्यासाठी रेल्वेने गेल्यावर्षीपासून क्रॉसिंग गेटच्या बाजूने अंडर ब्रीज किंवा ओव्हर ब्रीज बांधायला सुरुवात केली. ठिकठिकाणी अशा प्रकारे ब्रीज बांधून हे क्रॉसिंग गेट काढून टाकण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी हे क्रॉसिंग गेट अस्तित्वात असून, तेथून वाहतूक सुरू असल्याने अपघाताचाही धोका असतो. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून आता मात्र 'झिरो अॅक्सिडेन्ट'चे टार्गेट ठेवून विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार, ज्या ठिकाणी क्रॉसिंग गेट आहे, त्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांचा वेग रोखणारे ब्रेकर, तेथील रस्त्यांची स्थिती कशी आहे, त्याचे परीक्षण केले जात आहे. प्रत्येक गेटवरील गेटमॅनना सुरक्षेच्या मानकांबाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले जात आहे. नॉन-इंटरलॉक्ड गेट्सवर ऑडिओ रेकॉर्डिंगचे उपकरण चांगले आहे की नाही, त्याची पडताळणी होत असून जनरल अँड सब्सिडियरी रूल्स (जी अँड एसआर) अंतर्गत सुरक्षा उपकरणांची उपलब्धता कशी आहे, ते कोणत्या स्थितीत आहे, त्याचेही मूल्यांकन केले जात आहे. ९ जुलैपासून ही मोहीम सुरू झाली असून ती २३ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे.
संबंधित विभाग एकमेकांच्या संपर्कात
सुरक्षेची जबाबदारी ज्या विभागांची आहे, त्या ऑपरेटिंग, सिग्नल, दूरसंचार, अभियांत्रिकी, वीज विभागासह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या निरंतर संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नेमक्या वेळी संपर्कासाठी अडचण होऊ नये म्हणून एकमेकांच्या खासगी संपर्क क्रमांकाचे आदानप्रदान करण्यात आले आहे.