कतार एअरवेजची दोहा-नागपूर फ्लाइट पुन्हा सुरू; मात्र भाडे महागले

By नरेश डोंगरे | Updated: May 8, 2026 21:49 IST2026-05-08T21:49:40+5:302026-05-08T21:49:40+5:30

इकॉनॉमी क्लासमध्ये ४१ टक्के तर बिझनेस क्लासमध्ये ८७ टक्क्यांपर्यंत वाढ

qatar airways doha nagpur flight resumes but fares become more expensive | कतार एअरवेजची दोहा-नागपूर फ्लाइट पुन्हा सुरू; मात्र भाडे महागले

कतार एअरवेजची दोहा-नागपूर फ्लाइट पुन्हा सुरू; मात्र भाडे महागले

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनकतारमधील दोहा शहरासाठी थेट विमानसेवा २१ मेपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, तिकिट भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हवाई सफरीचा हा आनंद म्हणजे बोर दाखवून आवळा काढण्यासारखा प्रकार ठरला आहे.

आखाती देशातील युद्ध आणि वाढलेल्या तणावामुळे २७ फेब्रुवारीनंतर दोहा-नागपूर-दोहा दरम्यान कतार एअरवेजची थेट उड्डाण सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तब्बल २ महिने २१ दिवसांनंतर कतार एअरवेजचे विमान पुन्हा नागपुरात दाखल होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोहाहून नागपुरात येणाऱ्या फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासचे भाडे आता ३४ हजार रुपयांपासून सुरू होत आहे. इराण युद्धापूर्वी हेच भाडे सुमारे २४ हजार रुपये होते. म्हणजेच भाड्यात जवळपास ४१ टक्के वाढ झाली आहे. तर बिझनेस क्लासचे भाडे १ लाख रुपयांवर पोहोचले असून, पूर्वी ते सुमारे ६५ हजार रुपयांपासून सुरू होत होते. या श्रेणीत ५४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

दुसरीकडे, नागपूरहून दोहाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी इकॉनॉमी क्लासचे भाडे २३ हजार रुपयांपासून सुरू होत आहे. बिझनेस क्लासमधील प्रवाशांना पूर्वीचे भाडे ६५ हजार रुपयांपासून सुरू होत होते. ते आता १ लाख २२ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. म्हणजेच बिझनेस क्लासच्या भाड्यात तब्बल ८७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

फ्लाइटच्या वेळेत बदल

समर शेड्यूलमध्ये प्रथमच दोहा-नागपूर-दोहा फ्लाइटच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही फ्लाइट रात्री २.२० वाजता नागपूर विमानतळावर उतरायची, मात्र आता ती रात्री २.४५ वाजता येणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरहून दोहाकडे जाणारी फ्लाइट पूर्वी पहाटे ३.५० वाजता रवाना व्हायची, ती आता पहाटे ४.१५ वाजता रवाना होईल. पूर्वीप्रमाणेच ही विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध राहणार आहे.

म्हणून सेवा सुरू करण्याचा निर्णय

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कतार एअरवेजने नागपूरसाठीची सेवा बंद केली होती. सुरुवातीला ही सेवा मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ती १५ मे आणि पुढे १५ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता कतार एअरवेजने दोहाहून नागपुरासाठी २० मेपासून आणि नागपूरहून दोहासाठी २१ मेपासून सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Web Title : कतर एयरवेज की दोहा-नागपुर उड़ानें फिर शुरू, किराया बहुत ज़्यादा

Web Summary : कतर एयरवेज ने 21 मई से दोहा-नागपुर उड़ानें फिर से शुरू कीं, लेकिन किराया बहुत बढ़ गया है। इकोनॉमी क्लास का किराया 41% और बिजनेस क्लास का किराया कुछ मार्गों पर 87% तक बढ़ गया है। उड़ानों का समय भी थोड़ा बदल दिया गया है।

Web Title : Qatar Airways Doha-Nagpur Flight Resumes, Fares Soar Significantly

Web Summary : Qatar Airways resumes Doha-Nagpur flights from May 21 after a temporary suspension. However, fares have increased substantially, with economy class tickets rising by 41% and business class by 87% on certain routes. Flight timings are also slightly adjusted.