योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पोलिस खात्यात तीन दशकांहून अधिक सेवा केलेल्या निवृत्त पोलीस उपअधीक्षकांनाच प्लॉटच्या आमिषाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गंडा घालणारा आरोपीदेखील पोलीस निरीक्षकच होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त दरात भूखंड देण्याचे आमिष दाखवत त्याने सौदा झाल्यावर तब्बल २९ वर्षे टाळाटाळ केली. दरम्यान त्याने ते प्लॉट दुसऱ्याना विकले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून सखोल चौकशीतून जुन्या जमीन व्यवहारांमधील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तक्रारदार सुधाकर रामचंद्र पलांदुरकर (वय ७०) हे निवृत्त पोलीस उपअधीक्षक असून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. १९९३-९४ च्या सुमारास त्यांची ओळख तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेशसिंह रामसिंह गौरशी (कॉर्पोरेशन कॉलनी, नागपूर) झाली होती. त्यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पोलीस अधिकारी/कर्मचारी गृह निर्माण सहकारी संस्था स्थापन केल्याचे सांगत गौरने हिंगणा येथील भूखंड स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. पलांदुरकर यांना मौजा हिंगणा येथील खसरा क्रमांक १५ मधील जागेचा ले-आऊट दाखवत प्लॉट क्रमांक १९ देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी १९९४ ते १९९६ या काळात पलांदुरकर यांच्याकडून प्लॉटची संपूर्ण रक्कम आणि विक्री प्रक्रियेचे पैसे स्वीकारण्यात आले. मात्र पैसे घेतल्यानंतरही प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नाही किंवा विक्रीपत्र पूर्ण करण्यात आले नाही.
आरोपीने १९९७ मध्ये परस्पर संबंधित भूखंडासह तब्बल ४८ प्लॉटची विक्री केली. मात्र पलांदुरकर यांच्यापासून ही माहिती मुद्दाम लपवून ठेवण्यात आली. पुढील अनेक वर्षे सर्वांचे व्यवहार एकत्र पूर्ण करू असे सांगत त्यांची दिशाभूल करण्यात आली. २०१९ मध्ये सुरेशसिंह गौरने जुने विक्रीपत्र दाखवत त्यावर सह्या घेतल्या. मात्र त्यावेळीही प्रत्यक्ष भूखंडाचा ताबा देण्यात आला नाही. त्यानंतर पलांदुरकर यांनी महसूल विभागाकडे चौकशी केली असता, संबंधित ले-आऊट मंजुरी आणि टीपी रेकॉर्डमध्ये अनेक विसंगती आढळल्याचे समोर आले.
मूळ जमीन मालकाचा वारसदार असलेल्या प्रदीपसिंग गौरसोबत संगनमत करून न्यायालयात कथित खोटे तडजोडपत्र सादर करण्यात आल्याचेदेखील पलांदुरकर यांना लक्षात आले. मार्च महिन्यात पलांदुरकर यांनी तक्रार केली होती. पोलिसांनी सुरेशसिंह गौर व प्रदीपसिंह गौर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अगोदरच दोन गुन्हे दाखल
सुरेशसिंह गौरविरोधात यापूर्वीदेखील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व नागपूरमधील सदर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणामागे जमीन फसवणूकीचे मोठे रॅकेट कार्यरत होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.