नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 09:07 PM2019-10-26T21:07:42+5:302019-10-26T21:08:38+5:30

लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.

'Panja' raised in Nagpur with the help of NCP | नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

Next
ठळक मुद्देप्रकाश गजभिये, अहीरकर, पेठे, पडोळे, आर्य यांच्यासह राष्ट्रवादी उतरली प्रचारात : लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दिली साथ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात शड्डू ठोकला. मात्र, लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.
नागपूर शहरात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. पण राष्ट्रवादीने त्याचा मुद्दा केला नाही. पश्चिम नागपुरात राष्ट्रवादीचे आ. प्रकाश गजभिये यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना मोलाची साथ दिली. २००९ मध्ये पश्चिम नागपुरात अनीस अहमद हे काँग्रेसचे उमेदवार असताना प्रकाश गजभिये हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी गजभिये यांनी सुमारे २५ हजार मते घेतली होती. त्यामुळे अहमद यांचा सुमारे १८०० मतांनी पराभव झाला होता. यावेळी मात्र, गजभिये हे पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठिशी उभे राहिले. हिलटॉप, पांढराबोडी, अमरावती रोड या भागात गजभिये यांनी स्वत: महापालिकेच्या निवडणुकीत उभे असल्यासारखा गल्लीबोळात फिरून प्रचार केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी गळ्यात संदलचा ढोल टाकून बडवला. मतदारांच्या पाया पडले. गरिबांच्या झोपडीत जेवनही केले. राष्ट्रवादीला साथ द्या, काँग्रेसला ‘हात’ द्या, अशी विनवनी मतदारांना केली. विकास ठाकरे हे महापौर असताना प्रकाश गजभिये हे उपमहापौर होते. या जोडीने महापालिका गाजवली होती. तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. या निवडणुकीत गजभिये यांनी पुन्हा एकदा दोस्ती निभवली.
उत्तर नागपुरातही प्रकाश गजभिये यांची नितीन राऊत यांना मदत झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनीही यावेळी सामंजस्याची भूमिका घेत राऊत यांच्यासाठी जंग जंग पछाडले. पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला न सोडण्यात आल्यामुळे गटनेते दुनेश्वर पेठे सुरवातीला नाराज झाले होते. मात्र, नंतर आघाडीची प्रत्येक जागा महत्वाची असल्याचे सांगत ते काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्या प्रचारात उतरले. दक्षिण नागपुरात माजी आ. दीनानाथ पडोळे यांनी काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या प्रचारात पुढाकार घेतला. तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी संपूर्ण राष्ट्रवादी ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी कशी उभी करता येईल, यासाठी नियोजन केले. त्यामुळे काँग्रेसला मिळालेल्या यशात राष्ट्रवादीचे योगदान आहे, हे नाकारता येणार नाही.

Web Title: 'Panja' raised in Nagpur with the help of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.