उद्या ७ हजारांवर औषधी दुकाने राहणार बंद; ऑनलाइन औषधी विक्रीला विरोध
By सुमेध वाघमार | Updated: May 18, 2026 19:15 IST2026-05-18T19:12:24+5:302026-05-18T19:15:09+5:30
Nagpur : ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट' या संघटनेने बुधवार, २० मे रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे.

Over 7,000 drug stores to remain closed tomorrow; Opposition to online drug sales
सुमेध वाघमारे
नागपूर : ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट' या संघटनेने बुधवार, २० मे रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे. नागपूर शहर व ग्रामीणमधील जवळपास ७ हजारांवर औषधी दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णसेवा अडचणीत येणार असल्याने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ‘अलर्ट’वर असून नामांकित फार्मसी सुरू ठेवण्याची उपाययोजना केली आहे.
नागपूर एफडीएने औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत तातडीने बैठक घेऊन जनहित लक्षात घेता बंदमध्ये सहभागी न होण्याची विनंती केली आहे. तसेच, जिल्ह्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावरही संपर्क साधला जात आहे. प्रशासनाच्या सूचनेनंतर संपाच्या दिवशी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संघटनेने सहमती दर्शविली आहे.
'ही' औषध दुकाने नियमित सुरू राहणार
नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना औषधांसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. संप काळातही नामांकित फार्मसी साखळ्यांची दुकाने नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहतील. यात मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर यांच्या जवळपास १००वर औषधी दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत 'या' क्रमांकांवर साधा संपर्क
औषधांची तातडीची गरज भासल्यास नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता थेट अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक स्वाती भरडे, ९८९०८२८१९४, प्रशांत रामटेके ९०२८६७००२४, अभिषेक चवरडोल ८८९७९४०९८१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
गरज पडल्यास थेट औषध निरीक्षकांशी संपर्क साधा
"नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तातडीच्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांच्या गरजेसाठी प्रशासनाने दिलेल्या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा."
- मनिष चौधरी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर.