Now the lamp is lit! Nitin Raut's taunt to BJP over Italy love | आता दिवा पेटला ! इटलीप्रेमावरून नितीन राऊत यांचा भाजपला टोला

आता दिवा पेटला ! इटलीप्रेमावरून नितीन राऊत यांचा भाजपला टोला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटलीत झालेल्या जन्मावरून त्यांची हेटाळणी करण्यात भाजपचा जन्म गेला. मोदी आणि त्यांचे असंस्कृत सहकारी, सोनियाजींना, राहुलजींना इटलीवरुन किती अश्लील बोललेत याची गणतीच करता येणार नाही. पण थाळ्या वाजवा, लाईट विझवा, मेणबत्त्या लावा या कल्पना मात्र त्यांनी थेट कोरोनाग्रस्त इटलीवरुन आयात केल्या आहेत. आपले अपयश झाकायला, लोकांना एक ‘इव्हेंट’ द्यायला यांना सोयीस्कररीत्या ‘इटली’ चालते, तिथे यांचे बेगडी देशप्रेम, हिंदुत्व आडवे येत नाही, अशी टीका ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नीतीन राऊत यांनी भाजपवर केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पोशाखसुद्धा डॉ. मुंजे यांनी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीकडूनच आणला होता की! आता दिवा पेटला? तो मालवू नका असा टोला राऊत यांनी लगावला आहे. कुणी कधी, किती दिवे लावावे आणि विझवावे, कुठल्या कारणासाठी पेटवावे आणि मालवावे, हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. मी राज्याचा ऊर्जामंत्री असलो तरी त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा माझा आणि माझ्या पक्षाचा स्वभावसुद्धा नाही. कुणी काय खावे, काय प्यावे, काय लावावे हे सुद्धा आजकाल संस्कृती रक्षक ठरवतात. पण आम्ही वेगळे आहोत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

Web Title: Now the lamp is lit! Nitin Raut's taunt to BJP over Italy love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.