'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 00:11 IST2025-10-15T00:10:22+5:302025-10-15T00:11:27+5:30
मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाच्या मुसक्या आवळल्या.

'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाच्या मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्याच कार्यालयात मुसक्या आवळल्या. कार्यालयातील पेंशन विभागात एका त्रस्त महिलेकडून तक्रार मिळाल्यानंतर रेल्वेच्या सतर्कता विभागाने ही कारवाई केली. त्यानंतर विभागीय व्यवस्थापकांच्या (डीआरएम) कार्यालय परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. रोशन कुंभलवार असे लाचखोर मुख्य अधीक्षकाचे नाव असून, कारवाईनंतर लगेच त्याच्याकडून लाचेचे २५ हजार रुपयेही जप्त करण्यात आले.
रेल्वेच्या महिला कर्मचारी यांनी पेन्शन सुरू करण्यासाठी संबंधित विभागात रीतसर अर्ज केला होता. त्यानंतर अनेकदा काढण्यात आलेल्या त्रुट्यांचीही पूर्तता केली होती. तरीदेखील लाचखोर कुंभलवार याने त्यांची पेन्शन सुरू करण्यासाठी महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. वेगवेगळे कारण सांगून तो त्यांना येरझारा घालायला लावत होता. २५ हजार रुपयांची लाच दिल्याशिवाय पेंशन सुरू होणार नाही, अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने रेल्वेच्या व्हिजिलन्स टीम (सतर्कता पथक)कडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सतर्कता पथकाने सापळा रचला.
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयाच्या इमारतीत लाचखोर कुंभलवारचाही कक्ष आहे. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिला मंगळवारी दुपारी १२ वाजता कुंभलवारच्या कक्षात पोहोचली. ठरल्याप्रमाणे सतर्कता पथकाने शासकीय निधीतून दिलेली २५ हजारांची रोकड अर्थात ५०० च्या ५० नोटा महिलेजवळ होत्या. कुंभलकरने एका कोपऱ्यात जाऊन या नोटा स्वीकारल्या आणि नंतर तो आपल्या कक्षात जाऊन बसला. त्याचवेळी आजूबाजूला असलेल्या सतर्कता पथकातील अधिकाऱ्यांनी कुंभलवारच्या मुसक्या बांधल्या. सरकारी निधीतून देण्यात आलेल्या ५०० च्या नोटा कुंभलवारच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या.
कारवाईनंतर भूकंप, अनेकांची बोलती बंद
मुख्य अधीक्षकाला २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे वृत्त क्षणात डीआरएम बिल्डिंगमध्ये पोहोचले. त्यानंतर परिसरात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी कुंभलवारच्या कक्षाकडे धाव घेतल्याने तेथे मोठी गर्दी जमली. दुपारी घडलेल्या या कारवाईबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क करूनही माहिती मिळत नव्हती. रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडेही या संबंधाने माहिती उपलब्ध नव्हती.