लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'ग्रुप-४'च्या पदभरतीदरम्यान 'हायटेक कॉपी' करणाऱ्या उमेदवाराला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीने 'मुन्नाभाई एमबीबीएस' पद्धतीने कॉपीसाठी 'नॅनो इअरफोन'चा वापर केला. मात्र, पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व आरोपीविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास भीमराव चंदेल (३०, टाकळी कदीम, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी नागपुरात छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'ग्रुप ४'च्या पदभरतीसाठी परीक्षा होती. हिंगणा मार्गावरील मॉडर्न कॉलेज येथेदेखील परीक्षा केंद्र होते. विलास इतर उमेदवारांप्रमाणे परीक्षेला गेला.
मात्र, त्याने कानात 'नॅनो इअरफोन' टाकला होता तसेच मोबाइल सुरू करून तो कंपाउंडच्या भिंतीजवळ ठेवला होता. तेथील पर्यवेक्षिका प्रियांका उके यांना त्याच्यावर संशय आला व त्यांनी निरीक्षक चेतन गजभिये यांना माहिती दिली. गजभिये विलासजवळ पोहोचले असता त्याने इअरफोन काढून पायाजवळ लपविण्याचा प्रयत्न केला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ तो इअरफोन आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मेटल डिटेक्टरने त्याची तपासणी होणार असताना त्याने शिताफीने खिशातून मोबाइल काढून जवळील भिंतीवर तो लपविला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी सुरू असताना ही बाब समोर आली. नागपूर मेडिकलमधील न्यायवैद्यक शास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. हर्षवर्धन खरतडे यांच्या तक्रारीवरून विलासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.