Nagpur Regional Higher Education Joint Director removed | नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना हटविले

नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना हटविले

ठळक मुद्देकारणांचा खुलासा नाही : केशव तुपे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उच्च शिक्षण विभागाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. याअंतर्गत नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांना शासकीय विज्ञान संस्थेत त्यांच्या मूळ पदावर परत पाठविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या बदलांचे कारण स्पष्ट झालेले नाही.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही विभागांच्या सहसंचालकपदाची जबाबदारी केशव तुपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामागची कारणेदेखील स्पष्ट करण्यात आलेली नाही. ही पदे भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे याअगोदर कुठल्याही अधिकाऱ्याला त्याचा कार्यकाळ संपण्याअगोदर किंवा नवीन नियुक्तीच्या अगोदर हटविण्यात आलेले नाही. नागपूर-अमरावती विभागासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

कसे चालणार कामकाज
अमरावती व नागपूर विभागात नवीन सहसंचालकांची नियुक्ती करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नागपूर विभागात तीन विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांत मोठ्या संख्येत संलग्नित महाविद्यालये आहेत. नागपूर विद्यापीठातच ५५० हून अधिक संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील अनुदानित महाविद्यालयांची संख्या २०० हून अधिक आहे. अधिकारी नसल्यामुळे महाविद्यालयांत शिकविणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित राहतील. महाविद्यालयांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Web Title: Nagpur Regional Higher Education Joint Director removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.