Nagpur Medical college | ‘रेफर’ रुग्णांच्या मृत्यूचे खापर फुटते मेयो, मेडिकलवर

‘रेफर’ रुग्णांच्या मृत्यूचे खापर फुटते मेयो, मेडिकलवर

ठळक मुद्दे महिन्याभरात ६६ बालकांचा मृत्यू६० टक्क्यांवर गंभीर अवस्थेत येतात रुग्ण

सुमेध वाघमारे/ राजीव सिंह। रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शून्य ते एक महिन्याच्या बाळाच्या आजाराचे तातडीने निदान होऊन उपचाराखाली आणणे महत्त्वाचे असते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये येणाऱ्या या वयोगटातील चिमुकले इतर रुग्णालयातून गंभीर होऊनच येतात. यामुळे डॉक्टरांचे प्रयत्नही थिटे पडतात. मृत्यूचा वाढलेल्या आकड्याचे मात्र रुग्णालयावर खापर फोडले जाते. डिसेंबर महिन्यात मेडिकलच्या बालरोग विभागात भरती झालेल्या ६७७ रुग्णांमधून ४८ बालकांचा तर मेयोमध्ये ३०८ रुग्णांमधून १८ बालकांचा असे एकूण ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ विदर्भातीलच नव्हे तर छत्तीसगड, तेलांगणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून रुग्ण येतात. यात बाल रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. शून्य ते एक महिन्याच्या बालकांसाठी या दोन्ही रुग्णालयात ‘निओनेटल इन्टेन्सीव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) तर त्यावरील वयोगटातील रुग्णांसाठी ‘पेडियाट्रिक इन्टेन्सीव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) आहे. दोन्ही ठिकाणी ‘न्युओलेटर व्हेंटिलेटर’ व इतर आवश्यक उपकरणांच्या सोयी आहेत. परंतु रुग्णांची संख्या पाहता दोन्ही रुग्णालयात या सोयी अपुºया पडत असल्याचे वास्तव आहे. संबंधित विभागाने ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’च्या खाटा वाढविण्यापासून ते अद्यायावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मेडिकलमध्ये तर २७ खाटांचे स्वतंत्र ‘पेडियाट्रिक युनिट’चे बांधकाम तयार आहे, आता केवळ यंत्रसामुग्रीची प्रतीक्षा आहे. सध्यातरी आहे त्या सोयीत चिमुकल्यांना अद्ययावत उपचार देण्याचा दोन्ही रुग्णालयाचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सरासरी ६० टक्के रुग्ण हे दुसºया रुग्णालयातून मेयो, मेडिकलमध्ये उपचारासाठी येत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. यात आजाराचे निदान न झालेले, वेळेत उपचार न मिळालेले, गंभीर स्वरुपातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. काही तर पैसे संपले म्हणून मेयो, मेडिकलचा रस्ता दाखविणारे रुग्णालये आहेत. अशा स्थितीत रुग्णांच्या वाढत्या मृत्यूच्या संख्येवर मेयो, मेडिकलच्या बालरोग विभागाला जबाबदार धरले जात असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डिसेंबर महिन्यात बालरोग विभागाची स्थिती
डिसेंबर महिन्यात मेडिकलच्या बालरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात ३३४७ बालकांनी उपचार घेतले. यातील ६७७ बालकांना भरती करून उपचार करण्यात आले. यात शून्य ते एक महिन्याच्या ३४ नवजात अर्भकांचा, दोन ते सहा महिन्याच्या ४ बालकांचा, एक ते पाच वर्षांमधील ५ बालकांचा, पाच ते १० वर्षेवयोगटातील चार बालकांचा तर १० ते १४ वर्षांवरील एक बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. मेयोच्या बालरोग विभागातील आंतररुग्ण विभागात डिसेंबर महिन्यात ३०८ बालकांनी उपचार घेतले. यातील १८ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
अतिदक्षता विभागात झाले सर्वाधिक मृत्यू
मेयो, मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या बालकांमध्ये सर्वाधिक मृत्यू अतिदक्षता विभाग असलेले ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’मध्ये झाले. उपलब्ध माहितीनुसार मेडिकलच्या ‘एनआयसीयू’मध्ये ११२ मधून २३ तर ‘पीआयसीयू’मध्ये ७१ मधून १४ बालकांचा मृत्यू झाल्याचे सामोर आले आहे.

गंभीर झालेल्या
रुग्णांनाच रेफर करतात
दुसºया रुग्णालयातून मेडिकलच्या बालरोग विभागात पाठविण्यात येणाºया रुग्णांची टक्केवारी सुमारे ६० टक्क्यांवर पोहचली आहे. गंभीर झालेले रुग्ण ‘रेफर’ होऊन मेडिकलमध्ये येतात. यातील बहुसंख्य रुग्णांना वाचविण्यात यशही मिळते. परंतु काही प्रकरणांत अपयश हाती येते. शून्य ते एक महिन्याच्या नवजात अर्भकांच्या आजाराचे तातडीने निदान होऊन त्याला उपचाराखाली आणणे अतिशय आवश्यक असते. परंतु अशा रुग्णांमध्ये आधीच झालेल्या उपचारात उशीर हे मृत्यूचे कारण ठरते.
-डॉ. अविनाश गावंडे
बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: Nagpur Medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.